तिघांना अटक, एक फरार : करंट लावून शिकार करण्याचा प्रयत्न फसला

0
29

चामोर्शी- चामोर्शी वनपरिक्षेत्रा अंतर्गत अड्याळ -१ नियतक्षेत्रात ९ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास अवैधरित्या करंट लावून वन्यप्राण्याची शिकार करण्याचा प्रयत्न करणार्‍या ३ आरोपींना चामोर्शी वनपरिक्षेत्राच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे. अरूण किर्तीमंतराव मडावी, संतोष संन्याशी कुळमेथे दोघे रा. प्रियदर्शनी, जागेश्‍वर देवराव घोडाम रा. रश्मीपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अन्य एक फरार झाला आहे.
चामोर्शी वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी अड्याळ -१ नियतक्षेत्रात रात्रीच्या सुमारास सामुहिक गस्त करीत असतांना जंगल परिसरात अवैध्य तार पसरवून करंट लावलेला आढळून आला. तेव्हा वन कर्मचार्‍यांनी विद्युत विभागाशी संपर्क साधून सदर क्षेत्रातील लाईन खंडित करण्यास सांगितले व आरोपींवर पाळत ठेवली असताना पहाटेच्या सुमारास ४ संशयित इसम पसरविलेला तार गोळा करताना आढळून आले. कर्मचार्‍यांनी त्यांचा पाठलाग केले असता ३ इसम मिळाले व एक पळून गेला. पकडलेल्या इसमांची चौकशी केली असता त्यांनी जंगल परिसरात विद्युत करंट लावुन शिकार करण्यासाठी आलेलो आहोत असे सांगितले.
वनाधिकार्‍यांनी चार आरोपीं विरुध्द वनगुन्हा क्रमांक. 0८१७४/२0४३२८रु 0८/२0२३ अन्वये वनगुन्हा नोंद करून तिघांना अटक करून ११ मार्च रोजी रोजी न्यायदंडाधिकारी चामोर्शी यांचे दालनात हजर करण्यात आले.
पुढील तपास आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुलसिंह टोलीया, प्रकाष्ठ निष्कान अधिकारी प्रदिप बुधनवर यांचे मार्गदर्शनाखाली चामोर्शीचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. इनवाते वनपरिक्षेत्र यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहायक ए.व्ही. लिंगमवार, अड्याळ-१ चे वनरक्षक एम.आर. कोसरे, वनरक्षक विठ्ठल मेर्शाम, चामोर्शीचे वनरक्षक आनंद साखरे, किशोर वैरागडे, अक्षय राऊत , विकास लांजेवार, वाहनचालक दीपक दुधबावरे, वनमजुर ईश्‍वर जनबंधू, सखाराम पेदापल्लीवार व सुभाष पिटाले आदी करीत आहेत