गोंदिया : फिरायला गेलेल्या गोंदियातील सिध्दीविनायक कोचिंग क्लासमधील तीन शिक्षकांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना छत्तीसगडमधील सोमणी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मनगट्टा गावात घडली आहे. तीनही मृत शिक्षक हे गोंदियात एका कोचिंग क्लासमध्ये शिकवत होते. तिन्ही मृत शिक्षक हे नागपूर, भिलाई आणि उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत. तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
गोंदियातील सिध्दिविनायक या खासगी शिकवणी वर्गात शिक्षक असलेले तीन शिक्षक तमांगता धरण येथे १५ ऑगस्ट रोजी सहलीसाठी गेले होते. यातील चौघांपैकी तिघांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना १५ ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास घडली. त्यांच्यासोबत असलेले नारायण साळवे हे तलावाच्या बाहेरच राहिले. खूप वेळपर्यंत ते तिघेही पाण्याबाहेर न आल्याने बाहेर असलेल्या नारायण साळवे यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यामुळे तिथे नागरिकांची गर्दी झाली. यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. एन. मिश्रा रा. भिलाई, अरविंद रा. उत्तर प्रदेश आणि अतुल कडू रा. नागपूर असे या घटनेतील मृतकांची नावे आहेत.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर छत्तीसगड पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर शोधकार्य आणि बचावकार्य सुरु करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरु होते. रात्रीपर्यंत एक मृतदेह हाती लागला होता. अंधार पडल्याने शोध आणि बचावकार्य थांबवण्यात आले होते. त्यानंतर आज बुुधवारला सकाळी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु केल्यानंतर अन्य दोन मृतदेह सापडले.
गोंदियातील सिद्धिविनायक शिकवणी वर्गात शिकवत असताना गोंदियात वास्तव्याला असलेले सदर शिक्षक मूळचे यातील एक शिक्षक नागपूर, एक भिलाई आणि एक उत्तर प्रदेश येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.या बुडालेल्या तिघांचे मृतदेह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाने धरणाच्या बाहेर काढून राजनांदगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्या मृतदेहावर आज राजनांदगाव जिला रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठविले जाणार आहे.१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि १६ ऑगस्ट पतेती या सणानिमित्त लागोपाठ दोन दिवस सुट्टीचे आल्याने गोंदियातील सिद्धिविनायक शिकवणी वर्गाचे तीन शिक्षक भिलाईतील शिक्षक मित्राच्या आमंत्रणावर राजनांदगाव येथील मनगंट्टा धरणावर सहलीसाठी गेलेले होते.या घटनेनेे गोंदियातील खासगी कोचिंग संस्थामध्ये शोककळा पसरली आहे.