गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील राका/पळसगाव येथे ९ मार्च २०१६ रोजी शेतशिवारातील खोदलेल्या बोरवेलमध्ये ३ वर्षीय बालकाचा पडून मृत्यू (Child’s death) झाला. या बालकाच्या मृत्यूस शेतमालकाचा दुर्लक्षितपणा कारणीभूत असल्याचा ठपका दिवाणी न्यायाधिश सडक अर्जुनी यांनी ठेवला. दरम्यान या प्रकरणातील शेतमालक भावडांना न्यायालयाने दोषी ठरवून दोन महिन्याचा कारावास ठोठावला आहे. उल्लेखनिय असे की, यातील एका आरोपीचा आधीच मृत्यू झाला आहे तर दुसरा आरोपी ७४ वर्षाचा आहे. रामकृष्ण श्रावण चांदेवार असे हयात असलेल्या आरोपीचे नाव आहे.
सविस्तर असे की, सडक अर्जुनी तालुक्यातील राका/पळसगाव येथील रामकृष्ण चांदेवार व त्यांचा मुलगा देवराम चांदेवार यांनी शेतात आपल्या मालकीच्या जागेत बोरवेल खोदकाम केले होते. मात्र बोरवेलवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्यात आली नाही. ९ मार्च २०१६ रोजी विक्की खुशाल दोनोडे (३ वर्ष ३ महिने) हा खेळता खेळता बोरवेलच्या खड्ड्यात पडला. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. काही दिवसांपूर्वीच देशात प्रिंस नावाचा बालक खड्ड्यात पडला होता. त्याला सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आले होते. त्यामुळे विक्कीला खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी यंत्रणेकडून कसोसीचे प्रयत्न करण्यात आले. जवळपास तीन ते चार दिवस एनडीआरएफच्या पथकाने प्रयत्न करून विक्कीला बोरवेलमधून काढण्यात आले.
मात्र त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद फिर्यादी सिंधू नारायण दोनोडे हिच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिस ठाण्यात करण्यात आली. यातील आरोपी रामकृष्ण चांदेवार, देवराम श्रावण चांदेवार यांच्यासह त्यांच्या कुटूंबियाविरूध्द कलम ३३६, ३०४ (अ), ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पोलिसांनी दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले. या बहुचर्चित प्रकरणात सरकारी वकील ओ.एस.गहाणे यांनी न्यायालयासमक्ष एकूण १२ साक्ष तपासले.
दरम्यान न्यायाधिश डॉ.विक्रम आव्हाड यांनी मुख्य आरोपी रामकृष्ण श्रावण चांदेवार, देवराम चांदेवार या दोघांच्या दुर्लक्षितपणामुळेच विक्की दोनोडे याचा मृत्यू झाल्याने दोषी ठरविले. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही आरोपींनी दोन महिन्याचा तुरूंगवास व ७०० रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. उल्लेखनिय असे की, देवराम श्रावण चांदेवार या आरोपीचा मृत्यू झाला आहे. तर शिक्षेस रामकृष्ण श्रावण चांदेवार हा पात्र ठरला आहे. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस अधिकारी केंद्रे यांनी केले होते. न्यायालयात पोलिसांकडून भारत रामटेके यांनी कामकाज पाहिले.बोरवेल मृत्यू प्रकरणात मुख्य आरोपी रामकृष्ण श्रावण चांदेवार, देवराम श्रावण चांदेवार या दोघांसह आणखी दोन आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या निर्वाळ्यात न्यायालयाने या दोन्ही आरोपींशिवाय इतर दोन आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे.