गोंदिया ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सार्वजनिक शांततेस धोका होऊ नये, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून ‘एमपीडीए’खाली सराईत गुन्हेगाराला एक वर्षाकरिता भंडारा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर व रोहिणी बानकर यांनी केली. मनीष उर्फ जयराम धर्मराज सेवईवार (वय ४५, रा. बलमाटोला/रायपूर, ता. गोंदिया) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी ३ एप्रिल रोजी हा आदेश पारीत करीत स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केला असून, ४ एप्रिल रोजी गुन्हेगाराची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.दवनीवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार मनीष सेवईवार याच्यावर १६ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामध्ये दुखापत करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जबरी चोरी,
घरफोडी करणे, चाकूचा धाक दाखवून गंभीर दुखापत करणे, दहशत निर्माण करून मालमत्तेचे नुकसान करणे, शिवीगाळ करणे, धमकी देणे, अनुसुचित जाती जमातीच्या व्यक्तीवर अन्याय अत्याचार करणे, अवैध शस्त्रे बाळगणे अशा विविध प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. या गुन्हेगाराकडून सार्वजनिक शांततेस धोका असल्याने पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या निर्देशांन्वये अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, तिरोडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर, गोंदियाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनात दवनीवाडा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीविरुद्ध कारवाई करत एमपीडीए कायद्यानुसार प्रस्ताव तयार केला. दरम्यान, पोलिस अधीक्षकांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव मंजुरीकरिता पाठविण्यात आलेला होता. जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी या गुन्हेगाराविरूद्ध ३ एप्रिल रोजी स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केला.