
बुलढाणा : चिखलीच्या आमदार तथा भाजपच्या नेत्या श्वेताताई विद्याधर महाले पाटील यांना देण्यात आलेल्या शासकीय सुरक्षा रक्षकाने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना बुलढाणा येथे पोलीस वसाहतीत घडली. त्यांनी डोक्यात शासकीय बंदुकीतून गोळी झाडून घेतली. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण मात्र समजू शकले नाही. अजय गिरी असे या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव असून, रक्ताच्या थारोळ्यात त्यांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, गिरी यांची आज साप्ताहिक सुट्टी असल्याने ते आमदार निवास किंवा कार्यालयात गेले नव्हते.
आ. श्वेताताई महाले यांनी राज्य सरकारने सशस्त्र सुरक्षा व्यवस्था दिलेली आहे. पोलिस कॉन्स्टेबल अजय गिरी हे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत होते.बुधवार 31 जुलै रोजी त्यांनी अचानक त्यांच्या बुलढाणा येथील पोलिस वसाहतीत असलेल्या निवासस्थानी स्वतःवर शासकीय बंदुकीतून गोळी झाडून घेतली. ही घटना शेजारच्यांना माहिती कळताच त्यांनी तातडीने वरिष्ठांना कल्पना दिली, तसेच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गिरी यांना तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात हलवले. डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, उपचारादरम्यान गिरी यांची प्राणज्योत मालवली. गिरी यांनी आत्महत्या का केली ? याबाबतचा तपास बुलढाणा पोलिस करत आहेत. गिरी हे आज आमदार निवास अथवा कार्यालयाकडेदेखील गेले नव्हते. आज त्यांची साप्ताहिक सुट्टी होती. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमागे कौटुंबीक किंवा वैयक्तिक कारण असावे, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
अजय गिरी हे पोलीस दलात मुंबईला भरती झाले होते, 2017 मध्ये त्यांची बुलढाण्याला बदली होऊन पोलीस मुख्यालयातून त्यांना आ. श्वेताताई महाले यांचे अंगरक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. अवघ्या 38 वर्ष वयातच त्यांनी त्यांची जीवन संपवले. त्यांना पत्नी व एक मुलगा आहे. या घटनेचा बुलढाणा शहर पोलीस स्टेशन मध्ये कलम 194 बीएनएसएस (24) 2024 अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.