अकोला पोलीसांचे अवैध धंद्यांवर “ऑपरेशन प्रहार”…

0
30
अकोला -जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सोबतच अवैध धंद्यावर अंकुश लावण्यासाठी नव्यानेच रुजू झालेले पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी “ऑपरेशन प्रहार” या विशेष मोहिमेची घोषणा केली आहे. “अवैधतेचा अंत, प्रहाराचा प्रारंभ” या ब्रीदवाक्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचा आरंभ करण्यात आला आहे.
   पोलीस अधीक्षक यांनी रुजू होताच जिल्ह्यातील विविध अवैध व्यवसायांवर लक्ष केंद्रित करून कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः गोवंश तस्करी, बेकायदेशीर दारू उत्पादन आणि विक्री,जुगार अड्डे,मटका आणि अन्य सर्वच प्रकारचे अवैध धंदे यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत जिल्ह्यात कोणतेही अवैध व्यवसाय सहन केले जाणार नाहीत,अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याचे प्रमुख,उपविभागीय पोलीस अधिकारी व इतर संबंधित यंत्रणांना कडक निर्देश देण्यात आले असून, नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
   दि.२८.०५.२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख यांना दिलेल्या सुचना व निर्देशाप्रमाणे स्था.गु.शा. येथील पथकाने चांन्नी पोलीस स्टेशन हद्दीतील आलेगाव येथील अवैध जुगारावर धाड टाकण्यात आली. या कारवाईत वरली मटका खेळताना ६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीसांनी घटना स्थळावरून वरली मटका खेळण्याचे साहित्य, रोख रक्कम २६,२९० रुपये, १,६०,००० रुपये किंमतीच्या तीन मोटर सायकली, २१,००० रुपये किंमतीचे तीन मोबाईल, ६००० रुपये किंमतीच्या सहा प्लास्टिक खुर्च्या आणि १,००० रुपये किंमतीचे दोन प्लास्टिक पाण्याचे कॅन असा एकूण २ लाख १४ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तसेच पोलीस स्टेशन बार्शिटाकळी शहरातील जामा मशीद परिसरात राहणारा इसम नामे शेख शारीक हा गोवंशची कत्तल करीत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने लागलीच पोलीस स्टेशनला हजर असलेले अंमलदार यांच्या सह मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जावुन शहानिशा केली असता शेख शारीक हा कत्तल करीत असतांना मिळून आला. अंदाजे ३१० कीलो गोमांस किंमत ६,३८,५७० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे. दि.२५.०५.२०२५ रोजी गोवंश चोरीच्या गुन्हयातील २आरोपींना अटक करण्यात आली असुन त्यांचे कडुन १ गाय गुन्हयात वापरलेले वाहन असा एकुण २ लाख ६७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
    अकोला पोलीस दलाकडून यापुढेही छापे टाकून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाईल. गोवंश तस्करीसाठी वापरले जाणारी वाहने जप्त करणे, बेकायदेशीर दारूव्या भट्ट्या उद्धवस्त करणे आणि जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. या कारवायांमुळे अवैध व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊन जनतेचा विश्वास वाढणार आहे.
    या मोहिमेमुळे कायद्याचा धाक निर्माण होऊन अकोला जिल्हा अवैध धंदे मुक्त व सुरक्षित व्हावा, ही पोलीस अधीक्षकांची भूमिका आहे. सर्वसामान्य नागरिकांनी अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवावा, पोलीस दलाशी सहकार्य करावे, आपल्या परिसरात अशा प्रकारचे गैरप्रकार दिसल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक यांनी केले आहे. पोलीस विभागाच्या वतीने नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि सहकार्य या मोहिमेस अधिक बळ देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील जनतेस  सुरक्षित, शांततामय आणि कायद्याचे राज्य निर्माण करण्यासाठी “ऑपरेशन प्रहार” हा एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे.