ग्रापापु विभाग उपअभियंता व वरिष्ठ सहाय्यक लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

0
98
बीड,दि.२७ः-घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन योजनेच्या अंतिम बिलावर सही करून ते मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच मागणारा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा उपकार्यकारी अभियंता आणि वरिष्ठ सहायकाला बीड एसीबीच्या अधिकाऱ्यांनी च्या रंगेहाथ पकडले.
सदरहू कारवाई बीड जिल्हा परिषदेच्या परिसरात करण्यात आली आहे.  तक्रारदाराने दिलेल्या तक्रारी नुसार  पिंपळवंडी (ता.पाटोदा) येथील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन योजनेंतर्गत भूमिगत नालीचे काम पूर्ण झाले होते.तथा या कामाचे अंतिम देयक मंजुरीसाठी पाठवायचे होते. यासाठी उप कार्यकारी अभियंता मुकुंद चंद्रसेन आंधळे (वय ३३,रा. सारडानगरी, बीड) आणि त्याच कार्यालयातील वरिष्ठ सहायक किरण महादेवराव हिवाळे (४५, रा.शिंदेनगर,बीड) या दोघांनी तक्रारदाराकडे ८० हजारांच्या लाचेची मागणी केली होती.
यापैकी ३५ हजार नवीन कामासाठी, तर ५० हजार जुन्या कामासाठी मागण्यात आले होते. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली असता, आंधळे आणि हिवाळे यांनी ८० हजार रुपये लाचेची मागणी करून ती रक्कम किरण हिवाळे याच्यामार्फत स्वीकारण्याचे मान्य केले.एसीबीच्या पथकाने यासाठी सापळा रचून वरिष्ठ सहाय्यक,किरण हिवाळे याला तक्रारदाराकडून पंचांसमक्ष ८० हजारांची लाच स्वीकारताच रंगेहाथ पकडले. दोन्हीही लाचखोर आरोपींच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.