Home गुन्हेवार्ता वाहनासह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

वाहनासह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

0

गडचिरोली,दि.06ः- गोंदिया जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात दारूची तस्करी करणार्‍या वाहनासह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना आज ५ जुलै रोजी तालुक्यातील भेंडाळा ते सगणापूर मार्गावरील तुकूम फाट्यावर घडली.
चामोर्शी पोलिसांना गोंदिया जिल्ह्यातून चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील आजुबाजुच्या किरकोळ दारूविक्रेत्यांना दारू पुरवठा करण्यासाठी दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे चामोर्शी पोलिसांनी भेंडाळा – सगणापूर मार्गावरील तुकूम फाट्यावर सापळा रचला. दरम्यान, सगणापूरवरून भेंडाळाकडे एमएच-३१ सीएस-२८८२ क्रमांकाचे एक संशयित चारचाकी वाहन येताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी वाहनास थांबविले असता, वाहनातून दोन इसम खाली उतरून पळाले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता, ते गवसले नाही. मात्र वाहन चालक सचिन अशोक लांजेवार (३१) रा. तुमखेडा ता. गोरेगाव जि. गोंदिया याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून पळून गेलेल्या आरोपींचे नाव विचारले असता, गोलू उर्फ राजेंद्र सपन मंडल रा. कुनघाडा रै. ता. चामोर्शी, कालू उर्फ रूपेश सहारे जि. गोदिंया असे पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत.
सदर वाहनाची झडती घेतली असता, १ लाख ५0 हजार रूपये किंमतीची देशी दारू आढळून आली. तसेच ४ लाख ५0 हजार रुपये किंमतीचे चारचाकी वाहन असा एकूण ६ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सदर कारवाई पोलिस निरीक्षक गोरख गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे, पोलिस हवालदार नजीर पठाण, पोलिस नायक विनोद कुनघाडकर आदींनी केली.

Exit mobile version