ब्रम्हपुरी,दि.30 – चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील खंडाळा येथे गुप्तधनाच्या लालसेपोटी दोन वर्षाच्या चिमुरड्याचे अपहरण करून त्याचा बळी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युग मेश्राम असे बळी देण्यात आलेल्या बालकाचे नाव आहे.
युग मेश्राम हा 22 ऑगस्ट रोजी घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. युगचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके नेमण्यात आली होती. मात्र, युग मेश्रामचा मृतदेह घराजवळच असलेल्या एका तनशीच्या ढिगाऱ्यात 29 ऑगस्टला आढळून आला. पोलिसांनी याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतले होते. अखेर युग मेश्रामाचा नरबळी दिल्याच सुनील आणि प्रमोद बनकर या दोघांच्या चौकशीतून स्पष्ट झाले.युग घराबाहेर खेळत होता. त्याला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याचे आरोपींनी अपहरण केले. नंतर गुप्तधनाच्या लालसेपोटी युगची पूजा करुन त्याची हत्या केल्याची कबूली आरोपींनी दिली आहे.