चंद्रपूर,दि.05- घुग्घूसपासून जवळच असलेल्या ताडाळी एमआयडीसी परिसरातील धारीवाल या वीज निर्मिती कंपनीमध्ये बुधवारच्या रात्री एका कामगाराचा मृत्यू झाला असून मृत कामगाराचे नाव जनक राणे, रा.गोंदिया असे नाव आहे.धारीवाल कंपनीच्या दुर्लक्षामुळे कामगाराचा मृत्यू झाला असून आर्थिक मदत द्यायला सुध्दा कंपनी टाळाटाळ करीत असल्याने सदर कामगाराच्या कुटुंबियावर संकट कोसळले आहे.तर कामगारांच्या हितासाठी लढणारे नेतेही यावेळी कंपनीसमोर नतमस्तक राहिल्याचे चित्र समोर आले आहे.
मृतक जनक राणे हा मूळ गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असून, धारीवाल कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करीत होता. जनक राणे हे नेहमीप्रमाणे रात्रपाळीला होते. रात्री एक ते दीडच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे कळते. अपघात झाल्यानंतर कंपनीने जणकचे प्रेत त्याचा नातेवाईकांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता चंद्रपूर येथील इस्पितळांमध्ये पोस्टमार्टमकरिता पोलिसांच्या मदतीने नेले होते. त्यानंतर कंपनीने त्याच्या नातेवाईकांना याविषयी कळविले. यामुळे काहीवेळ कंपनी परिसरात तणाव निर्माण झाला होता.
धारीवाल कंपनीच्या दुर्लक्षामुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला, असा आरोप मृतक जनक राणे यांच्या परिवारातर्फे करण्यात आलेला आहे. वृत्त लिहीपयर्ंत कंपनीने कोणताही मोबदला कामगाराच्या नातेवाईकांना देण्याचे जाहीर केलेले नव्हते. या प्रकरणामुळे कामगारांचे असंतोष निर्माण झाला असून, पुन्हा कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अपघातामुळे कामगाराच्या परिवारावर शोककळा पसरली आहे.