
वर्धा,दि.08ः तीन मुली झाल्याने विवाहितेचा छळ करीत तीनदा तलाक, तलाक, तलाक म्हणत विवाहितेला घराबाहेर काढून दिल्याने आर्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने तीन तलाक रद्द केल्यानंतर वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदाच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमय्या फिरदोस शेख मोहसीन (२२) यांचा विवाह फिरदोस शेख मोहसीन याच्यासोबत २0१५ मध्ये झाला. फिरदोस हा टाईल्स, फर्निचरचे काम करतो. २0१६ मध्ये विवाहितेला एक मुलगी झाली. त्यानंतर २0१८ मध्ये दोन जुळ्या मुली झाल्या. विवाहितेला मुलगा होत नसल्याने फिरदोसने विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देत छळ करणे सुरू केले. फिरदोस हा दारू ढोसून घरी येत विवाहितेला मारहाण करीत असे. तसेच तुझ्या नशिबात मुलगा नाही, तुला मुलीच होतात, असे म्हणून विवाहितेला शिवीगाळ करीत होता. मी दुसरे लग्न करतो, असे वारंवार म्हणत होता. गुरुवारी सायंकाळी फिरदोस हा कामावरून घरी आला. विवाहितेची प्रकृती बिघडल्याने ती झोपून होती. दरम्यान, फिरदोस याने तू झोपून का आहेस, असे म्हणत जेवणाचे ताट फेकून देत विवाहितेला मारहाण केली आणि तलाक, तलाक, तलाक असे म्हणून तिला घराबाहेर काढून दिले. अखेर विवाहितेच्या तक्रारीवरून आर्वी पोलिसांत फिरदोस मोहसीन रा. आंबेडकर वॉर्ड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.