तुमसर,दि.23ःः तालुक्यातील सिहोराजवळील बपेरा (सि.) येथील प्रगती केंद्रीय निवासी आश्रम शाळेतील तिसर्या वर्गात शिकणार्या चिमुकलीची छेड काढणार्या त्याच शाळेतील शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
शेखर साखरे (४0) रा. बपेरा असे आरोपी शिक्षकाचे नाव असून सिहोरा पोलिस ठाण्यात २0 मार्च रोजी त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.
प्रगती केंद्रीय निवासी आश्रम शाळा बपेरा येथील शिक्षक शेखर साखरे याने त्याच शाळेतील इयत्ता तिसर्या वर्गात शिकणार्या एका चिमुकलीची छेड काढल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडाली. या शाळेत नागपूर, मोहोड (मध्यप्रदेश) आणि परिसरातील खेडे गावातील मुले मुली निवासी राहतात. या शाळेतील शिक्षक शेखर साखरे याने केलेले अशोभनीय कृत्य त्या चिमुकल्या मुलीने आपल्या पालकांना सांगितले.
त्या पालकांनी त्वरीत सिहोरा पोलिस ठाण्यात जाऊन शिक्षकाविरुद्ध तक्रार नोंदविली. ठाणेदार देवेंद्रसिंग ठाकूर आणि पथकाने रात्री १२.३0 वाजेच्या सुमारास बपेरा येथील शेखर साखरे याच्या घरी जाऊन तो झोपलेला असताना त्याला अटक केली. आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहे.