चंद्रपूर,दि.23ः येथिल प्रसिद्ध व आघाडीची शैक्षणिक संस्था म्हणून परिचित असलेल्या चांदा पब्लिक स्कूल प्रशासनाविरुद्ध पालक मैदानात उतरले असून सोमवारी (दि.२१) जवळपास ३00 पालकांच्या स्वाक्षरीचे निवेदन घेऊन ७0 ते ८0 पालक शाळेत पोहोचले. शाळा शुल्क न भरल्यामुळे मुलांची परीक्षा घेण्यात आली नाही, असा आरोप पालकांनी केला.
सविस्तर वृत्त असे की, चांदा पब्लिक स्कूल ही इंग्रजी माध्यमाची जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे. हजारो विद्यार्थी इथे शिक्षण घेतात. दरवर्षी जवळपास सर्वच पालक आपल्या मुलांची शाळेची फी प्रामाणिकपणे भरतात. यावर्षी आलेल्या कोरोना संकटामुळे आणि त्यामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्वांचेच जिवन अस्ताव्यस्त झाले आहे. सर्वांनाच आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून अजुनही कित्येक लोक या परिस्थितीमधून बाहेर आले नाही. शासनाने इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी शैक्षणिक शुल्क आकारून इतर सर्व शुल्क माफ करण्याचे सांगितले आहे. तरीही कित्येक इंग्रजी माध्यमाच्या शाळा पालकांवर दबाव टाकत असून जबरदस्तीने शुल्क वसूल करण्याची मोहिम सुरू आहे.
असाच प्रकार चांदा पब्लिक स्कूलमध्येही होत असल्याचा आरोप करून सोमवारी पालकांनी शाळेकडे धाव घेतली. पालक शाळेत येणार असल्याची कुणकुण लागल्याने शाळा व्यवस्थापनाने आधीच पोलिस संरक्षण मागून घेतले होते, हे विशेष. प्रसार माध्यमांसमोर पीडित पालकांनी आपली कैफियत मांडली. या शाळेने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन वर्ग सुरू केले असले तरीही रोज सर्व विषयाचे अध्ययन होत नाही केवळ २ ते ३ विषय अभ्यासले जात असून शाळा मात्र संपूर्ण शुल्क आकारत असून शाळेने शैक्षणिक शुल्काच्या ५0 टक्के शुल्क आकारणी करावी या मुख्य मागणीसह हे पालक शाळेच्या व्यवस्थानाला निवेदन देण्यास गेले होते. सर्वात आश्चयार्ची गोष्ट म्हणजे कालपासून विद्याथ्यार्ची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार होती मात्र ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरले नाही त्यांना परीक्षेचे आयडी आणि पासवर्ड देण्यात आलेले नाही. या प्रकारामुळे पालकांमध्ये संताप निर्माण झाला असून पालक तसेच शाळा व्यवस्थापनादरम्यान संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे.
वस्तूत: शिक्षणाच्या अधिकाराच्या कायद्यान्वये विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवता येत नाही. मग शाळेने असा निर्णय घेतलाच कसा? हा प्रश्न कायम आहे, मात्र शाळा प्रशासनाने आमच्या संगणकीकृत व्यवस्थेमुळे त्यांना आयडी पासवर्ड मिळाला नसल्याचा दावा व्यवस्थापनाने केला आहे.
चांदा पब्लिक स्कूल विरोधात पालक मैदानात
फी भरली नसल्याने विद्यार्थ्यांची परीक्षा रोखण्याचा आरोप