मुंबई, दि. २6 मार्च: मुंबई विद्यापीठाने पीएचडी आणि एमफील प्रवेश परीक्षेसाठीच्या जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दिनांक २६ मार्च आणि २७ मार्च या दोन दिवसांत विविध विषयांसाठी पेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांनी नोंदणी केलेल्या ईमेलवर सविस्तर माहिती पाठविण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. तसेच २५ मार्च रोजी आयोजित एमफील प्रवेश परीक्षा सुरळीत पार पडली असून या परीक्षेला विविध विषयांतील एकूण ४०३ पैकी २२३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.
पेट परीक्षेच्या नियोजनाचा भाग म्हणून विद्यापीठाने दिनांक १२ ते १७ मार्च दरम्यान सराव परीक्षेचे आयोजन केले होते. त्यास पुन्हा मुदतवाढ देऊन दिनांक २१ मार्च २०२१ पर्यंत सराव परीक्षा देण्याचे आवाहन विद्यापीठामार्फत करण्यात आले होते. विद्यापीठाने पेट परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर केले असून यानुसार ठरलेल्या वेळापत्रकानुसार २६ आणि २७ मार्च २०२१ रोजी पीएचडी प्रवेश परीक्षा होणार आहे. एकूण ७९ विषयांसाठी ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. या परीक्षांच्या दरम्यान जर विद्यार्थ्यांस काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास त्यांना खालील दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येईल.
(संपर्कासाठी हेल्पलाईन क्रमांक 02228857050, 02228857048, 02228857043, 02228857034, 02228857035, 8291989298, 7700907079, 8657746186, 9372511846, 9372511847)