वाईट गुणांची प्रतिकात्मक होळी दहन करून विद्यार्थ्यांनी घेतला नवा संकल्प

0
46

मांडवीच्या जिल्हा परिषद शाळेतर्फे सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

सिहोरा : दि. २७-तुमसर तालुक्यातील मांडवीच्या जिल्हा परिषद शाळेत होळी या हिंदू सणाचे औचित्य साधून इयत्ता ५ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाळेतील उपक्रमशील शिक्षक दामोदर डहाळे यांच्या मार्गदर्शनात स्वतःतील वाईट गुण कागदावर लिहून काढून त्यांची प्रतिकात्मक होळी केली व प्रत्येक विद्यार्थ्यांनी ते दोष दूर करण्याचे उपाय म्हणून ‘माझा नवा संकल्प’ या अभिनव उपक्रमांतर्गत त्यांचा संकल्प घेवून तो आजन्म जोपासण्याची मान्यवरांच्या उपस्थितित शपथ सुद्धा घेतली घेतली.
सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात इ. ७ वी मधून इ. ८ वी मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना निरोप म्हणून शाळेतर्फे निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांतर्फे शाळेला घड्याळ स्नेह भेट म्हणून देण्यात आले. तसेच सहावीच्या विद्यार्थ्यांकडून सातवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला पिण्याच्या पाण्याची बाटली भेट वस्तू म्हणून देण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये त्यांच्या जिवनाचा पाया मजबूत झाल्याचे सांगून या भक्कम पायावर त्यांनी यशाची इमारत तयार करण्याचे सुचवून पूढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. इयत्ता सातवीच्या सर्वच विद्यार्थ्यांनी मांडवीच्या शाळेमध्ये त्यांना आलेले सर्व बरेवाईट अनुभव त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले. तसेच मांडवीच्या शाळेने केलेले संस्कार आणि दिलेले ज्ञान भविष्यात सुद्धा जोपासण्याचे आश्वासन दिले.
या निरोप समारंभाला अध्यक्ष म्हणून रवींद्रकुमार सरोदे (अध्यक्ष शा.व्य.स.), प्रमुख अतिथी म्हणून शापोआ अधीक्षक तथा केंद्रप्रमुख टी. ए. कटनकार, मुख्याध्यापक पी. डी. राऊत, पदवीधर शिक्षिका के. डी. पटले तसेच सहाय्यक शिक्षक एन. जी. रायकवार व दामोदर डहाळे उपस्थित होते. सूत्रसंचालन इयत्ता सहावीच्या राणु मते हिने केले तर साक्षी ढबाले हिने उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी इयत्ता पाचवी व सहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी तसेच शाळेतील स्वयंपाकी मंगला ढबाले व मदतनीस सरिता मते यांनीसुद्धा मोलाचे सहकार्य केले.