
लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या हस्ते उदघाटन
मुंबई, दि.११ जून- भारत ही सामरिक अध्ययन क्षेत्राची भूमी आहे. शतकानुशतके या भूमीत यावर अभ्यास केला गेला आहे. मुंबई विद्यापीठात नव्याने स्थापन होत असलेल्या आंतरराष्ट्रीय संबंध आणि सामरिक अभ्यास केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संबंध आणि सामरिक अध्ययन क्षेत्रात अभ्यास आणि संशोधनासाठी मोठी संधी उपलब्ध होऊ शकेल असा आशावाद लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी व्यक्त केला. कालपरत्वे बदलत्या परिस्थितीनूसार परराष्ट्रीय धोरण, आंतरराष्ट्रीय संबंधांवर सखोल अभ्यास होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंबई विद्यापीठात या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संबंध आणि सामरिक अध्ययन विभागाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या उद्घघाटन सोहळ्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र. कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी, या विभागाचे संचालक तथा अधिष्ठाता मानव्य विद्याशाखा प्रा. राजेश खरात, कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड, या विभागाचे सहाय्यक संचालक प्रा. बाळकृष्ण भोसले, मानव्य विद्याशाखेच्या सहयोगी अधिष्ठाता प्रा. मंजिरी कामत यांच्यासह देशातील अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होते. पुढे ते म्हणाले की, सैन्य दल आणि मुंबई विद्यापीठाचे जुने पारंपारिक संबंध आहेत. नेव्हल वॉर कॉलेजची सलंग्नता ही मुंबई विद्यापीठाशी जुनीच आहे, या नवीन विभागाच्या माध्यमातून हे संबंध असेच दृढ होत जातील अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. सोबतच मुंबई आणि पुण्याच्या अवतीभवती असणाऱ्या सैन्य दलांच्या विविध संशोधन संस्था आणि महाविद्यालये यांच्याबरोबर शैक्षणिक अभ्यासक्रम आखला जाऊ शकतो. पुढे ते म्हणाले की, सामरिक विचारवंतांचा अभ्यास करताना आपण नेहमी आल्फ्रेड महान किंवा डोहे याच विचारवंताचा अभ्यास करावा लागतो, मात्र येथून पुढे मुंबई विद्यापीठातून सामरिक अध्यासनाचे अनेक भावी विचारवंत तयार होऊन भारताला २१ व्या शतकात मार्ग दाखवू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतीय सैन्य हे सदैव आपल्या भूमीच्या सरंक्षणात तत्पर आहेत. भारतीय लष्कर हे तंत्रस्नेही होत असून कृत्रिम बुद्धीमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्स, ऑटोमेशन, क्वांटम टेक्नॉलॉजी अशा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आगेकूच करीत आहे. विद्यापीठ स्तरावरील अशा प्रकारच्या अभ्यास केंद्राच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंध, परराष्ट्र धोरण आणि सामरिक अध्ययन तसेच या क्षेत्रातील संभाव्य आव्हानांचा संखोल अभ्यास करून विश्लेषण करणे अधिक सोयीचे होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सामरिक अभ्यास विषयाची वाढती मागणी आणि पश्चिम भारतात या विषयातील अभ्यासासाठी उपलब्ध असलेल्या अल्प संसाधनामुळे मुंबई विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंध आणि सामरिक अभ्यास विषयावर सखोल अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी स्वतंत्र नवीन विभाग या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येत आहे. तर आंतरराष्ट्रीय आणि सामरिक अभ्यासाच्या माध्यमातून राजकीय घडामोडी आणि सामाजिक-आर्थिक तसेच परदेशी देशांमधील कला-साहित्य आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा अभ्यास या केंद्राच्या माध्यमातून केला जाणार असून सौहार्दपूर्ण पद्धतीने देशांचे संबंध चालविण्यात मदत होऊ शकेल असे प्र. कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा या विभागाच्या स्थापनेची पार्श्वभूमी विशद करताना प्रा. राजेश खरात म्हणाले की, मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर असून भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मुंबई शहर आणि आसपास असलेले वाणिज्य दूत, उच्चायोग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संबंधित कार्यालये या शहरात आहेत. काही मोजकी विद्यापीठे सोडली तर आंतरराष्ट्रीय संबंध, परराष्ट्र धोरण आणि सामरिक अध्ययन केंद्रासाठी स्वतंत्र अभ्यास केंद्र नाहीत, त्यामुळे ही उणीव भरून काढण्यासाठी या विभागाची स्थापना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण, त्याच्या मुलभूत संकल्पना, सिद्धांत तसेच संरक्षणातील सामरिक विचार समजून घेण्यासाठी व या क्षेत्रातील व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध होण्यासाठी या विभागाचे महत्व असल्याचेही त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय संबंध आणि धोरणात्मक अभ्यास हा विषय केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग आणि कर्मचारी निवड मंडळाच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच करिअर-आधारित परीक्षांमधील एक महत्वाचा घटक समजला जातो. या दृष्टिकोनातून या विभागाचे महत्व अधिक अधोरेखित होत असल्याचे त्यांनी सांगितले. मानव्य विद्याशाखेअंतर्गत दोन वर्षीय एम.ए. हा पूर्णवेळ अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून सुरू केला जाणार असल्याचेही प्रा. राजेश खरात यांनी सांगितले.