Home Top News महाज्योती अधिछात्रवृत्ती निवड प्रक्रियेत 2021 च्या विद्यार्थ्यांना डावलले,विद्यार्थ्यांचा आत्मदहनाचा इशारा

महाज्योती अधिछात्रवृत्ती निवड प्रक्रियेत 2021 च्या विद्यार्थ्यांना डावलले,विद्यार्थ्यांचा आत्मदहनाचा इशारा

0

ओबीसी मंत्री,महाज्योतीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकाविरुध्द विद्यार्थ्यामध्ये रोष

गोंदिया,दि.25ः-महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (महाज्योति) या संस्थेची स्थापना नागपूर येथे ९ ऑगस्ट २०१९ रोजी करण्यात आली असून सदर संस्थेच्या माध्यमातून ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी या घटकातील संशोधक विद्यार्थी संशोधनाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा उद्देश असला तरी सध्याच्या घडीला या संस्थेच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांची भूमिका विद्यार्थी विरोधी असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या निषेध नोंदविण्यासाठी आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

पीएचडीधारक विद्यार्थ्यांना अधिशिष्यवृत्ती देण्याकरीता पात्र विद्यार्थ्यासांठी महाज्योतीने 18 जून २०२१ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिछात्रवृत्तीच्या जाहिरातीनुसार (MJPRF-२०२१, पी.एच.डी) पात्र असलेल्या (२०१७ पासून २०२1 पर्यंत) सर्व पी.एच.डी च्या विद्यार्थ्यांनी त्यासाठी अर्ज केले.परंतु महाज्योतीच्या प्रशासकीय यंत्रणेने 24 आँगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये २०२०-२१ व २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील पी.एच.डी विद्यार्थ्यांवर महाज्योतिच्या व्यवस्थापकीय संचालकांद्वारे वगळून त्यांच्यावर अन्याय करण्यात आल्याची माहिती अर्जदार असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी बेरार टाईम्सला दिली. विशेष म्हणजे 2019 मध्ये स्थापन झालेली महाज्योती संस्था असून २०२०-२१ चे नोंदणी असलेले पी.एचडी चे विद्यार्थी पात्र असतानाही यांनाच नेमके यामधून वगळून या विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यात आल्याचा सूर या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.ज्या विद्यार्थ्यांनी निव्वळ फेलोशिपच्या भरोश्यावर पीएचडीला नोंदणी केलेली असताना त्यांनाच यामधून वगळण्यात आले आहे. महाज्योती संस्थेने सर्व नियम व अटी लागू करूनच जाहिरात काढलेली असताना सर्व नियमांची येथे मात्र पायमल्ली करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे.या झालेल्या प्रकाराबद्दल विद्यार्थ्यांनी आक्रोश केला असता synopsis चे कारण देण्यात आले.मात्र असा नियम कोणत्याच संस्थेचा नाही,प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना कोरोनामुळे synopsis साठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असताना महाज्योतीने वेळोवेळी नवीन कारणे देत या विद्यार्थ्यांना डावलण्याचे काम केल्याचे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. संस्थेचे जे नियम आहेत त्याचा वापर कुठेही झालेला दिसत नाही. परंतु जो नियम कुठेच नाही असा नियम लावून प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना फेलोशिप पासून वंचित ठेवण्याचे काम सुरू केल्याचे परभणी येथील एका विद्यार्थ्यांने सांगितले.
गेली दोन ते अडीच वर्षे होऊनही संस्थेने विद्यार्थ्यांना अद्याप कुठलीच सुविधा व लाभ दिलेला नसताना नवनवीन अटी लादून संस्थेच्या प्रशासकीय यंत्रणेने विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव निर्माण केल्याने संस्थेला नेमक काय साध्य करायच आहे यावर विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठ प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे.
विद्यार्थ्यांनी ठेवलेल्या अपेक्षांचा भंग होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना एक तर पीएचडी सोडणे एवढाच पर्याय उरलेला आहे.त्यामुळे संस्थेच्या या धोरणाच्या विरोधात सर्व विद्यार्थी येत्या दोन दिवसात एकत्र येत संस्थेच्या नागपूर कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा तयारीत असल्याचे डावलण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे म्हणने आहे.
पण मुळातकोणत्याही नियमांची अंमलबजावणी न करता नको ते नियम लाऊन पीएचडी २०२०-२१ च्या विद्यार्थ्यांना डावलण्यात आलेले.आम्हा सर्व विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यात यावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.यानंतर जर काही अनुचित प्रकार महाज्योतीचा भोंगळ आणि बेजबाबदार कारभारामुळे एखादा बळी जाण्याची वाट मंत्री वडेट्टीवार बघत आहे का? का असे प्रश्नही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

Exit mobile version