मत्स्यपालन क्षेत्रात संशोधनाला मिळणार चालना

0
20

मुंबई विद्यापीठ आणि केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था यांच्यात सामंजस्य करार

मुंबई, दि. २२ डिसेंबर- मत्स्यपालन क्षेत्रात संशोधन आणि उद्योन्मुख विकासाच्या संधीचे नवीन दालन खुले करण्यासाठी मुंबई विद्यापीठ आणि केंद्रीय मत्स्यपालन संस्था यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. या करारान्वये शैक्षणिक आदान-प्रदान, संशोधन आणि सहयोग या क्षेत्रावर विशेष भर देण्यात आला आहे. केंद्रीय मत्स्यपालन संस्थेचे संचालक डॉ. एन. पी. साहु, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव सुधीर पुराणिक यांनी या करारावर सह्या केल्या. यावेळी समन्वयक म्हणून विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा मजुमदार आणि केंद्रीय मत्स्यपालन संस्थेच्या अधिष्ठाता (बाह्य संबंध), डॉ. अपर्णा चौधरी उपस्थित होत्या.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत्राला लाभलेला विस्तीर्ण समुद्र किनारा, विपूल नैसर्गिक साधन संपत्ती या सर्व पुरक बाबींवर रितसर अभ्यास आणि संशोधन करण्यास यामुळे वाव मिळणार आहे. मुंबई विद्यापीठातील विज्ञान विभाग, रत्नागिरी आणि नव्याने स्थापन झालेल्या सिंधुदुर्ग उपपरिसरातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल असे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा मजुमदार यांनी सांगितले.