Home शैक्षणिक नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाचे वेध

नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाचे वेध

0

 नागपूर सहलीत अनेक स्थळांना भेटी

नागपूर, दि. ११ : अतिदूर्गम व नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोलीतील विद्यार्थ्यांनी नागपूरातील रमन विद्यान केंद्राला भेट देऊन हसत-खेळत शिक्षणाद्वारे विज्ञानाचे महत्व जाणून घेतले. यामुळे शैक्षणिक जीवनात मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे मनोगत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
नक्षल प्रभावित जिल्ह्यामधील १० ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी व त्यांच्या मनातील नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी तसेच राज्यात इतर ठिकाणी झालेली औद्योगिक, आर्थिक व शैक्षणिक प्रगतीची माहिती व्हावी, यासाठी राज्य शासनातर्फे आपला महाराष्ट्र सूवर्ण जयंती सहल आयोजित करण्यात आली होती. याअंतर्गत गडचिरोलीतील शालेय विद्यार्थ्यांनी दिनांक ९ व १० जानेवारी रोजी नागपूर येथील विविध स्थळांना भेटी दिल्या.
रमन विज्ञान केंद्र येथे विद्यार्थ्यांनी विज्ञानाबाबत अनेक नाविण्यपूर्ण गोष्टी जाणून घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी रमन विज्ञान केंद्रात आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनीला भेट देऊन वैज्ञानिक क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीची माहिती जाणून घेतली. रमन विज्ञान केंद्राचे शिक्षण अधिकारी ए.बी. भेलावे यांच्या मार्गदर्शनात शिक्षण प्रशिक्षक जीवन पटले यांनी विविध प्रयोग प्रत्यक्षपणे सादर करून विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्व पटवून दिले. समाजात घडणा-या अनिष्ठ प्रथांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी केवळ विज्ञानाची कास धरावी, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. विद्यानाच्या मार्गदर्शनातून शैक्षणिक आयुष्यासाठी नवी दिशा मिळाली, असे मत मुरुमगाव येथील शासकीय आश्रम शाळेतील अश्विनी मडावी हिने व्यक्त केले. तर रमन विज्ञान केंद्राला भेट दिल्यानंतर अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाली, असे नागोजी कुसराम या विद्यार्थ्याने सांगितले.
या सहलीत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या गडचिरोलीतील विविध तालुक्यातील ४० मुली व ४१ मुले सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी नागपूर येथील दीक्षाभुमी, आकाशवाणी, वस्तु संग्रहालय, अंबाझरी गार्डन आदी स्थळांना भेटी दिल्या. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे, औरंगाबाद येथील विविध स्थळांना भेटी देऊन माहिती जाणून घेतली.

Exit mobile version