
नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)च्या संयुक्त गट-क लिपिक कर सहायक पदासाठी ऑगस्ट महिन्यात होऊ घातलेल्या मुख्य परीक्षेआधी म्हणजेच १ जुलै २०२२ पूर्वी उमेदवारांना टंकलेखन प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. मात्र, टंकलेखन परीक्षा घेणाऱ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २३ फेब्रुवारी रोजी नियोजित परीक्षा अद्यापही न घेतल्याने बहुसंख्य उमेदवार ‘एमपीएससी’च्या मुख्य परीक्षेला मुकण्याची दाट शक्यता आहे.
‘एमपीएससी’तर्फे ३ एप्रिलला संयुक्त गट-क पूर्व परीक्षा घेण्यात आली. मुख्य परीक्षा ही ६, १३ आणि २० ऑगस्टला होणार आहे. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना जुलै महिन्यात मुख्य परीक्षेसाठी अर्ज करावा लागणार आहे. संयुक्त गट-क परीक्षेतील लिपिक कर सहायक पदासाठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. मुख्य परीक्षेचा अर्ज करताना टंकलेखनाचे प्रमाणपत्र उमेदवारांना जोडावे लागणार आहे.
राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने वर्षांतून दोनदा टंकलेखन परीक्षा घेतली जाते. मात्र, टंकलेखनाची नियोजित परीक्षा अद्याप न झाल्यामुळे उमेदवार अडचणीत सापडले आहेत. परीक्षा परिषदेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका उमेदवारांना बसण्याची चिन्हे आहेत. याबाबत विचारणा करण्यासाठी परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांच्याशी संपर्क साधला असता ते रजेवर असल्यामुळे त्यांनी यासंदर्भात माहिती देण्यास नकार दिला.
‘टीईटी’ घोटाळय़ानंतर परीक्षा परिषदेचे काम ठप्प
शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात ‘टीईटी’ घोटाळय़ानंतर राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा खोळंबल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसून परीक्षेवर जणू बंदी घातल्याचे चित्र आहे. आता फेब्रुवारीमध्ये नियोजित टंकलेखन परीक्षा न झाल्यास स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा फटका बसणार आहे. टीईटी घोटाळय़ानंतर परीक्षा परिषदेचे काम ठप्प झाल्याचे चित्र आहे.