सुरकुंडीच्या मुलींच्या निवासी शाळेचा निकाल १०० टक्के 

0
11
राज्यातील निवासी शाळेच्या निकालात सुरकुंडीच्या ३ मुली अव्वल
गुणवंत विद्यार्थीनींचा सत्कार
वाशिम दि.२०- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राज्यात अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी इयत्ता ६ ते १० वीपर्यंत सेमी इंग्रजी शाळा चालविण्यात येतात. जिल्ह्यात रिसोड तालुक्यातील सवड आणि मंगरुळपिर तालुक्यातील तुळजापूर येथे मुलांसाठी आणि वाशिम तालुक्यातील सुरकुंडी येथे मुलींसाठी निवासी शाळा आहे. नुकताच शालांत परीक्षा २०२२ चा निकाल लागला. या निकालात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राज्यात चालविण्यात येत असलेल्या निवासी शाळांपैकी सुरकुंडी येथील निवासी शाळेचा निकाल १०० टक्के लागला. राज्यातील निवासी शाळांपैकी सुरकुंडी येथील निवासी शाळेच्या तीन विद्यार्थिनी राज्यातील गुणवत्ता यादीत चमकल्या. यामध्ये रूपाली सभादिंडे (९५.८० टक्के) – प्रथम, गायत्री सरदार ( ९५.२० टक्के) -द्वितीय, आणि ममता तायडे (९५ टक्के) – तृतीय क्रमांक मिळविला.
    सुरकुंडी येथील निवासी शाळेच्या ३८ विद्यार्थिनी ह्या परीक्षेला बसल्या. ३८ विद्यार्थिनीही उत्तीर्ण झाल्या. त्यामध्ये ३० विद्यार्थिनीनी ९५ टक्क्यांपेक्षा आणि ८ विद्यार्थीनीनी ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतले.
            निवासी शाळेतील मुलींनी शालांत परीक्षेत मिळविलेल्या यशाचे कौतुक करण्यासाठी नुकताच त्यांच्या सत्कार समारंभ सुरकुंडी येथील निवासी शाळेत आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारुती वाठ हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक ए.आर भगत होते.
         श्री वाठ यावेळी बोलतांना म्हणाले, विद्यार्थिनींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श पुढे ठेवून गुणवत्तापुर्ण शिक्षण घ्यावे.मुलींच्या शिक्षणात शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा देखील महत्त्वाचा वाटा आहे.समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्यातील निवासी शाळा ह्या एक मॉडेल म्हणून विकसित होत आहे. प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनीही निवासी शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
          मुख्याध्यापक श्री भगत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थिनींनी देखील मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला निवासी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीनीची उपस्थिती होती.