शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरु

0
16

गोंदिया,दि.30 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 16 व्यवसाय असून 39 तुकड्या कार्यरत आहे. यात 10 व्यवसाय दोन वर्षीय अभ्यासक्रम व 6 व्यवसाय एक वर्षीय अभ्यासक्रमाचे आहेत. संस्थेत यावर्षी ऑगस्ट-2022 प्रवेश सत्रामध्ये एकूण 16 व्यवसायाकरीता 25 तुकड्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

         प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पध्दतीने सुरु होणार असून 17 जून 2022 पासून सर्व उमेदवारांना www.dvet.gov.in किंवा www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपले Registration व Password तयार करुन सर्व मुळ कगदपत्रानुसार अर्जामध्ये अचुक माहिती भरुन व Online Application Fee भरुन आपला अर्ज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन निश्चित करु शकतील. अर्ज निश्चित झाल्यानंतर उमेदवाराने व्यवसाय व आयटीआय करीता विकल्प भरावयाचा आहे. प्रत्येक प्रवेश फेरीनुसार उमेदवारांच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर त्यांना संदेश प्राप्त होणार आहेत. तरी देखील काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संस्थेत भेट देऊन प्रवेश मार्गदर्शन कक्षामध्ये आपल्या शंका निरसन करता येतील. सुट्टीच्या दिवशी सुध्दा प्रवेश मार्गदर्शन कक्ष मदतीकरीता सुरु राहील. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य के.एम.मोटघरे यांनी केले आहे.