Home शैक्षणिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने योगदान द्यावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने योगदान द्यावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0

पुणे, दि.२: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सर्व प्रकारचे शिक्षण एकाच ठिकाणी देण्याचे नियोजन असून यामध्ये सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने योगदान द्यावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि ‘इंडियन जिओटेक्निकल सोसायटी’ (आयजीएस) यांच्या संयुक्त विद्यमाने सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ येथे आयोजित ‘आयजीएस’च्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त साकारलेल्या बोधचिन्हाचा ई-अनावरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.कारभारी काळे, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुकुल सुतावणे, आयजीएसचे अध्यक्ष विकास पाटील, युवा संकल्प अभियान समितीचे अध्यक्ष राजेश पांडे आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, संरचनांचा पाया मजबूत करण्यासोबतच त्यावर संशोधन करण्याचे कार्य सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठामध्ये होते. आज पुण्यात मोठमोठ्या इमारती, मेट्रो, उड्डाणपुल उभारण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे या क्षेत्राचे महत्व लक्षात घेता त्यादृष्टीने नवनवीन उपक्रम राबवून संशोधनात्मक काम करण्याची गरज आहे.

पुढील वर्षाच्या जानेवारीमध्ये जी-२० राष्ट्रसमुहाच्या परिषदेतील सत्रांचे महाराष्ट्रात मुंबईसह पुणे व औरंगाबाद येथे आयोजन करण्यात येणार आहे. परिषदेचे प्रतिनिधी पुण्यातील ऐतिहासिक व महत्वाची वारसा ठिकाणे, शैक्षणिक ठिकाणे, उद्योग आदी ठिकाणी भेटी देणार आहेत. नागरिकांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कुलगुरु प्रा. सूतावणे म्हणाले, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने अनेक उत्तुंग व्यक्तिमत्व घडविण्याचे कार्य करुन मानवतेच्या कल्याणाची सेवा केली आहे. विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, प्राध्यापकांना स्वातंत्र्य देऊन ज्ञानाचा प्रसार करण्याचे कार्य या संस्थेत करण्यात येत आहे. समाजाला रुचेल, पचेल आणि झेपेल अशाप्रकारे शिक्षण देण्यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.

विकास पाटील म्हणाले, आयजीएस संस्थेचा देशात ४८ शाखा असून पुणे शाखा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. संस्थेतील अभियंते जमिनीखालील बांधकामाचा अभ्यास करीत असतात. या विषयात अतिशय अद्यावत तंत्रज्ञान विकसित करुन ते समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहाेचवून समाजात जास्तीत जास्त अभियंते निर्माण करण्याचे नियोजन आहे, असेही ते म्हणाले.

पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते आयजीएसचे संस्थापक अध्यक्ष रमेश कुलकर्णी, सीओईपीचे नियामक मंडळाचे माजी सदस्य तथा जनसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र हिरेमठ आणि सीओईपीचे पहिले कुलगुरु प्रा. डॉ. सुतावणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि आयजीएस संस्थेची माहिती देणाऱ्या चित्रफितीचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
000

Exit mobile version