समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांच्या बदलीकरीता मुकाअसह जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना निवेदन

0
14

15 ते 16 वर्षांपासून कार्यरत तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या होणार जिल्हाअंतर्गत बदल्या?

गोंदिया : जिल्हा परिषद सर्व/समग्र शिक्षा अभियानात तालुकास्तरावर व डायट अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्याही प्रशासकीय बदल्या सन 2019 ला आलेल्या मार्गदर्शन पत्रानुसार माहे एप्रिल व मे महिन्यात करण्यात यावे असे निवेदन अवघड क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना देऊन बदलीची मागणी केली.

दरवर्षी देवरी, सालेकासा, आमगाव, अर्जुनी मोर, सडक अर्जुनी या तालुक्यात कार्यरत कर्मचारी जिल्हा परिषदेला बदली बाबत निवेदने देतात. परंतु  सर्वसाधारण क्षेत्रात व स्थानिक तालुक्यात कार्यरत कर्मचारी स्थानिक राजकीय नेते मंडळींकडे जाऊन जिल्हा परिषदेवर बदल्या न करण्याबाबत दबाव आणतात. त्यामुळे मागील चार वर्षांपासून जिल्हातर्गत बदल्या झालेल्या नाहीत.

निवेदन प्राप्त होताच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांना 2019 च्या मार्गदर्शन पत्रासह प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या व प्रशासकीय बदल्या करणे हे प्रशासनाचे काम आहे व ते करणार असे सांगितले.तसेच या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांची ही भेट घेऊन बदली बाबत निवेदन देवून पाठपुरावा करण्याची विनंती केली असता सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या या व्हायलाच पाहिजेत एकाच ठिकाणी 10 ते 15 वर्ष हे कर्मचारी कसे कार्यरत आहेत? याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांचेशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.सोबतच शिक्षणाधिकारी प्राथमिक व डायट प्राचार्य यांनाही कर्मचाऱ्यांनी निवेदन देऊन नियमानुसार बदली करण्याबाबत विनंती केली.
यापूर्वी झालेल्या बदल्या  सन 2013 ला केंद्रास्तरावर कार्यरत समग्र शिक्षा विषय साधनव्यक्तीं यांच्या केंद्रास्तरावर चे पद गोठविण्यात आल्याने त्यांना तालुकानिहाय सहा सहा पदांवर समायोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्ह्यात कार्यरत 95 साधनव्यक्तींपैकी 47 साधनव्यक्तींचे नांदेड जिल्ह्यात बदलीने समायोजन झाले होते तर 48 साधनव्यक्तींना गोंदिया जिल्ह्यात आठ तालुक्यात समायोजित करण्यात आले होते. त्यामध्ये देखील बरेच कर्मचारी हे 2006 पासून त्याच तालुक्यात आजपावेतो कार्यरत आहेत. तर काही कर्मचाऱ्यांच्या इतर तालुक्यात बदली करून समायोजन करण्यात आले होते. गोंदिया तालुक्यातील लेखापाल यांची सडक अर्जुनी तर सडक अर्जुनी मधून गोंदिया तालुक्यात बदलीने आले. सडक अर्जुनी तालुक्यातील एम. आय. समन्वयक यांना सालेकसा तालुक्यात आणि सालेकसा येथील आमगाव तालुक्यात बदली करण्यात आली. संसाधन विशेष शिक्षकांच्याही मधल्या काळात बदल्या करण्यात आल्या. त्यांना तालुकास्तरावरून केंद्रस्तरावर आस्थापना देण्यात आली प्रत्येकाकडे दोन केंद्रांची जबाबदारी देण्यात आली. 2019 ला देखील काही निवडक विषय साधनव्यक्तींच्या विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या ज्यात गोंदियावरून तिरोडा, आमगाव वरून गोंदिया, सालेकसावरून आमगाव अशा बदल्या करण्यात आल्या.

काही तालुके कर्मचाऱ्यांविना- समग्र शिक्षा अंतर्गत सर्व तालुक्यांवर विषय साधनव्यक्ती, संसाधन शिक्षक, समावेशीत शिक्षण तज्ञ, लेखापाल, डाटा एन्ट्री ऑपरेटर, एम.आय.एस. समन्वयक असे पदे कार्यरत आहेत. त्यापैकी चार तालुक्यात एम.आय.एस. समन्वयक व डाटा एन्ट्री ऑपरेटर चे पदे रिक्त आहेत ते देखील एम.पी. एस. सी. कडून परवानगी घेऊन भरण्यात यावे जेणेकरून इतर कर्मचाऱ्यांवरील डाटा एन्ट्री व ऑनलाईन कामाचा बोझा कमी होईल अशीही मागणी करण्यात आली आहे.निवेदन देतेवेळी वशिष्ठ खोब्रागडे, प्रदीप शरणागत, अंकला माने, राजेश मते, प्रमोद सिंगनजुडे, रवी पटले हे कर्मचारी उपस्थित होते.

“समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांच्या यापूर्वी झालेल्या बदल्या व सन 2019 च्या मार्गदर्शक पत्राचे अवलोकन करून बदलीबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुचविल्याप्रमाणे नक्कीच बदलीची कार्यवाही करण्यात येईल.”
– डॉ. महेंद्र गजभिये, शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद गोंदिया.