
समग्र शिक्षा विभागाचा उपक्रम.
जिल्हा समन्वयक विजय ठोकणे यांची माहिती.
गोंदिया-शिक्षणाबरोबरच भविष्यात स्वयंरोजगाराची संधी स्थानिक स्तरावर प्राप्त व्हावी व दिव्यांग असूनही समाजाचा एक उत्पादक घटक म्हणुन जगता यावे या हेतूने समग्र शिक्षा विभागाचा दिव्यांग विभागामार्फत जिल्ह्यांतील 180 विद्यार्थ्यांकरिता व्यावसायिक कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दिनांक 1 मे पासुन तालुका स्तरावर करण्यात येत असल्याची माहिती दिव्यांग विभागाचे जिल्हा समन्वयक विजय ठोकणे यांनी दिली आहे.
आंगणवाडी ते 12 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग मुलांना शिक्षणाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समग्र शिक्षा विभागाच्या मार्फत विवीध शैक्षणीक, वैद्यकीय व पुनर्वसनात्मक सेवा दिल्या जातात. याच बरोबर शिक्षणानंतर स्थानिक स्तरावर स्वयं रोजगार उपलब्ध व्हावा. किंवा परिवाराला आथिर्क सहाय्य व्हावं या हेतूने 2015 पासून समग्र शिक्षा विभागांच्या दिव्यांग विभागाच्या मार्फत अशा मुलांसाठी व्यावसायिक कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
यात अगरबत्ती तयार करणे, पाय पुसनी, खडू तयार करणे, फाईल तयार करणे, रांगोळी तयार करणे, शिवणकाम, बेकरी उत्पादने प्रशिक्षण, स्क्रीन प्रिंटिंग, संगणक प्रशिक्षण, फिश पॉट तयार करणे व आलू चिप्स तयार करून पॅकिंग करणे इत्यादी कौशल्य तालुका स्तरावर 47 रिसोर्स टीचर व 16 समावेशीत शिक्षण तज्ञ यांचे मार्फत शिकविल्या जाणार आहेत. सदर प्रशिक्षण शिबिर दिनांक 1 मे 2023 ते 24 जुन 2023 पर्यंत चालणार आहे. सदर शिबिरात आमगाव 15, अर्जुनी मोरगाव 14, देवरी 29, गोंदिया 27, गोरेगांव 20, सडक अर्जुनी 32, सालेकसा 22 व तिरोडा येथील 21असे एकुण 180 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनील पाटील व प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ महेंद्र गजभिये यांच्या मार्गदर्शनात पार पडणार असल्याची माहिती जिल्हा समन्वयक विजय ठोकणे यांनी दिली आहे.