गोंदिया, दि.6 : भारताने चंद्रयान 3 चे यशस्वी सॉफ्ट लॅन्डींग दक्षिण ध्रुवावर करुन जगामध्ये इतिहास स्थापन केला. दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅन्डींग करणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे, त्यामुळे देशात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. याचा अनुभव आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मिळावा व विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण व्हावी, यासाठी आश्रम शाळेतील विद्यार्थी विक्रम साराभाई अंतरिक्ष प्रदर्शनी सेंटर अहमदाबाद येथे भेट देणार आहेत.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत येणाऱ्या शासकीय व एकलव्य आश्रम शाळेतील 50 विद्यार्थी भारत भ्रमणसाठी रवाना झाले. 5 ते 12 ऑक्टोबर 2023 या दरम्यान विद्यार्थी विविध ठिकाणांना भेटी देऊन त्या ठिकाणांचा अभ्यास करणार आहेत. यासाठी शासकीय आश्रम शाळेमध्ये इयत्ता 9 वी व 10 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची 50 गुणांची परीक्षा घेऊन या परीक्षेमध्ये जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड या अभ्यास दौऱ्यासाठी करण्यात आलेली आहे. यामध्ये शासकीय आश्रमशाळा बोरगाव व मजितपुर येथील प्रत्येकी 5 विद्यार्थ्यांची तर शासकीय आश्रमशाळा जमाकुडो, कडीकसा, बिजेपार व कोयलारी येथील प्रत्येकी 4 विद्यार्थ्यांची तसेच शासकीय आश्रमशाळा पालांदुर, इळदा, शेंडा, ककोडी व पुराडा येथील प्रत्येकी 3 विद्यार्थ्यांची व एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कुलचे 4 विद्यार्थी असे 18 विद्यार्थी व 27 विद्यार्थीनींची निवड विज्ञान शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी करण्यात आलेली आहे.
या विज्ञान शैक्षणिक अभ्यास दौऱ्यामध्ये विक्रम साराभाई अंतरिक्ष प्रदर्शनी सेंटर अहमदाबाद, सायन्स सिटी अहमदाबाद, साबरमती आश्रम, कांकरिया लेक, आनंद येथील अमोल डेअरी, स्टॅच्यू ऑफ युनिटी, मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, नरिमन पॉईंट, मुंबई विधानभवन, मंत्रालय, नेहरु प्लॅनेटेरियम, नेहरु सायन्स सेंटर अशा अनेक ठिकाणांना हे विद्यार्थी भेटी देणार आहेत. सदर विद्यार्थ्यांच्या देखरेखीसाठी दिपेश मांडे, संजय बोंतावार, एकता भलावी, चारुलता शहारे हे शिक्षक व चंदू कोरोंडे चतुर्थ श्रेणी कर्मचारी सोबत असणार आहेत.
प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांची प्रतिक्रीया…
आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जगाची ओळख व्हावी, त्यांच्या ज्ञानात भर पडावी, विद्यार्थ्यांना विज्ञानाविषयी व नविन तंत्रज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण होऊन भविष्यात आश्रम शाळेतून सुध्दा वैज्ञानिक तयार व्हावे या उदात्त हेतुने ही नाविण्यपूर्ण योजना आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मंजूर करुन घेतली. विद्यार्थी पहिल्यांदाच विमानाने प्रवास करीत असल्याने त्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता, हे बघुन खुप समाधान वाटले. यापुढेही या विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी अशाच नाविण्यपुर्ण योजना राबविणार आहे. |