देवरी येथील छ. शिवाजी शिक्षण संकुलात भव्य शिवजयंतीचे आयोजन

0
16

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार सत्कार

सुरेश भदाडे

देवरी,दि.१५- स्थानिक छत्रपती शिवाजी शिक्षण संकुलात येत्या १९ फेब्रवारी रोजी ‘जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या ३५० व्या जयंतीचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान, दोन दिवस चालणाऱ्या या जयंती उत्सव आयोजनात इतर कार्यक्रमांसह विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती कृष्णा सहयोगी शिक्षण संस्थेचे सचिव अनिल येरणे यांनी पत्रपरिषदेत आज (दि.१५) दिली.

संस्थेच्या औषधशास्त्र महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रामकृष्ण येरणे, कोशाध्यक्ष जयश्री येरणे आणि विविध विभागांचे विभागप्रमुख प्राामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना सचिव येरणे पुढे म्हणाले की, गेल्या २५ वर्षापूर्वी शिवाजी शिक्षण संकुलात लावलेल्या या लहानशा शिक्षणरुपी रोपट्याचे आज विशाल वटवृक्षात रुपांतर झाले आहे. या संस्थेमार्फत अनेक शिक्षण शाखांतून उत्तम आणि दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. भविष्यात वैद्यकीय शिक्षणासह काही महत्वपूर्ण शिक्षणसोयी या भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याच्या दिशने संस्थेची वाटचाल सुरू असून लवकर यश मिळेल, असा आशावाद त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. शैक्षणिक कार्य करत असताना नानाविध उपक्रम सुद्धा येथे उत्तम प्रकारे राबविले जात असून त्याचाच एक भाग म्हणून या शिक्षण संस्थेमार्फत दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सुध्दा दिमाखात साजरी केली जाते.

यावर्षी आयोजित ३५०व्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १७ फेब्रुवारीला या सोहळ्याचा पहिला टप्पा राहणार असून यामध्ये भव्य रक्तदान शिबिर,ऑर्ट आणि क्राफ्ट, रांगोळी, नेल ऑर्ट आदी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आहे. यानंतर १९ तारखेला मुख्य जयंती सोहळा होणार असून गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री इंजि. राजकुमार बडोले यांचे अध्यक्षतेखाली गोंदियाचे पोलिस अधीक्षक निखील पिंगळे उद्घाटक म्हणून उपस्थित राहतील. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अड. येशूलाल उपराडे, प्रमुख वक्ता म्हणून यवतमाळचे शिवव्याख्याते प्रा. प्रवीण देशमुख, माजी आमदार संजय पुराम, भाजप नेते वीरेंद्र अंजनकर, देवरी पंचायत समितीच्या सभापती अंबिका बंजार,नगराध्यक्ष संजय उईके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, या सोहळ्याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह देवरी तालुक्यात १०वी आणि १२वीच्या परीक्षेत प्रथम आणि द्वितिय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. विशेष म्हणजे देवरीचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आणि गेल्या ३० वर्षापासून देवरी परिसरात वेद्यकीय सेवा देणारे डॉ दीपक धुमनखेडे यांचा सुद्धा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याची माहीती यावेळी उपस्थित पत्रकारांना देण्यात आली.