Home शैक्षणिक विद्यार्थ्यांच्या तक्रारींसाठी ‘विद्यार्थी संवाद’ ठरतोय प्रभावी माध्यम

विद्यार्थ्यांच्या तक्रारींसाठी ‘विद्यार्थी संवाद’ ठरतोय प्रभावी माध्यम

0

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी विद्यार्थी संवाद

विद्यापीठाने केले विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण

मुंबई, दि. ०४ मे: विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व अनुषंगिक बाबींशी निगडीत प्रश्न, शंका, समस्या यांचे निरसन करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने सुरू केलेला विद्यार्थी संवाद हा उपक्रम प्रभावी माध्यम ठरत आहे. निकाल, राखीव निकाल, पुनर्मूल्यांकन, छायांकीत प्रत आणि गुणपत्रिका अशा अनुषंगिक तक्रारींचे निवारण जलदगतीने आणि तात्काळ होत आहे. आज आयोजित केलेल्या तिसऱ्या विद्यार्थी संवाद उपक्रमाच्या माध्यमातून एकूण १४ तक्रारींचे निवारण करण्यात आले. यामध्ये राखीव निकाल, पुनर्मूल्यांकनाचे निकाल, तात्पुरते पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका अशा अनुषंगिक विषयांचा समावेश होता. विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आयोजित आजच्या विद्यार्थी संवाद कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलातील छत्रपती शिवाजी महाराज भवन (नवीन परीक्षा भवन) येथे आज या कार्यक्रमाचे करण्यात आले होते.

आज उपस्थित १४ विद्यार्थ्यांच्या तक्रारींमध्ये बीएमएएस राखीव निकाल, एमएससी बोयोटेक सत्र ४ चा निकाल, अभियांत्रिकी सत्र २ राखीव निकाल, एलएलएम सत्र १ राखीव निकाल, संगणक शास्त्र सत्र दोन पुनर्मूल्यांकन निकाल, पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका अशा अनुषंगिक तक्रारी विद्यार्थ्यांनी उपस्थित केल्या. या सर्व तक्रारींचे निवारण विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांचे निकाल राखीव होते अशा विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्याचे पत्र देण्यात आले, तर काही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात आल्या.

मुंबई विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभाग आणि संलग्नित महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी विद्यापीठात विद्यार्थी संवाद उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमातील पुढील संवादाची तारीख विद्यापीठाकडून लवकरच जाहीर केली जाणार आहे.

कोट:
“विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी विद्यापीठाने हा उपक्रम सुरू केला आहे. मागील तीन उपक्रमातून यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या समस्येवर जलदगतीने तोडगा काढला जात असल्याने त्यांच्या चेहर्‍यावर दिसून येणारा आनंद आणि समाधान विद्यापीठ प्रशासनाला अतिशय महत्वाचा वाटतो आहे.”
प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू मुंबई विद्यापीठ

Exit mobile version