
तासगाव,दि.०६ः सांगली जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या तासगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आबासाहेब लावंड व विस्तार अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी जिल्हा परिषद शाळा विसापूरला भेट देत शाळेच्या परिसराची पाहणी केली.तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधत कौतुक केले.
गटशिक्षणाधिकारी श्री.लांवड विसापूर नं १ शाळेच्या परसबागेचे अवलोकन करीत असताना शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री. राऊत यांनी त्यांना परसबागेची माहिती दिली.तसेच प्लॅस्टिक मुक्त परिसर अंतर्गत कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभागी होत श्री.लावंड व श्री.चव्हाण यांनी विद्यार्थ्यांसोबत परिसरातील प्लॅस्टिक कचरा संकलन करीत प्लास्टिकमुक्ती का गरजेची यावर मार्गदर्शन केले.त्यानंतर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या व जिल्हास्तरासाठी पात्र ठरलेल्या मुला,मुलींचे पाहुण्यांनी अभिनंदन करीतजिल्हास्तरासाठी शुभेच्छा दिल्या.श्री.लावंड व श्री.चव्हाण यांनी सर्व कामकाजावर समाधान व्यक्त करुन गुणवत्ता वाढीसाठी कसे प्रयत्न करता येतील याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.याप्रसंगी आभार विषय शिक्षक दिपक काळे यांनी मानले.