
गोंदिया : राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) शनिवारी (दि.१४) नीट यूजी २०२५ चा निकाल जाहीर केला. यात गोंदिया जिल्ह्यातील ३५ वर विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. यात आमगाव तालुक्यातील भजेपार येथील विशाखा रहांगडाले या विद्यार्थिनीने ३००२ रैंकिग प्राप्त करीत बाजी मारली.
नीट परीक्षेत ऑल इंडिया ३००२ रैंकिंग घेऊन उत्तीर्ण होणारी विशाखा रहांगडाले ही आमगाव तालुक्यातील भजेपार या गावातील विद्यार्थिनी आहे. हे गाव ग्रामीण क्षेत्रात आहे. विशेष म्हणजे विशाखाचे वडील हे टेलर तर आई गृहिणी आहे. विशाखाने शिकवणी वर्गात दररोज १० ते १२ तास अभ्यास आणि परीक्षेचा सराव करून हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशाचे कौतुक केले जात आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असणारी नीट यूजी परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. देशभरातील आणि परदेशातील केंद्रांवर ही परीक्षा ४ मे २०२५ रोजी घेण्यात आली. ज्यात २२ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. आता प्रवेश प्रक्रिया संबंधित प्राधिकरणांमार्फत पार पडेल. गोंदिया जिल्ह्यातील विविध खासगी शिकवणी वर्गाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यात स्थानिक सिद्धिविनायक एज्युकेशन इन्स्टिट्यूटची विद्यार्थिनी विशाखा रहांगडाले या विद्यार्थिनीने ऑल इंडिया ३००२ रैंकिंग प्राप्त केले आहे.
यासह जिल्ह्यातील २३ विद्यार्थीसुद्धा चांगल्या रॅकिंगने उत्तीर्ण झाले असून त्यांना चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.