Home शैक्षणिक रामपूरच्या शाळेला अजूनही कुलूप

रामपूरच्या शाळेला अजूनही कुलूप

0

आमगाव दि.१८(berartimes.com): जोपर्यंत गावकऱ्यांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही, असा ठाम निर्णय रामपूर येथील शाळा समितीच्या पदाधिकारी व गावकऱ्यांनी घेतला आहे. दरम्यान आमगावचे गटशिक्षणाधिकारी के.वाय. सर्याम यांनी भ्रमणध्वनीवरुन विद्यार्थ्यांना टी.सी. देवून टाका, असा अफलातून आदेश मुख्याध्यापकाला दिल्याने हे आंदोलन अधिक चिघळले आहे.
आमगाव पं.स. अंतर्गत रामपूर (पानगाव) येथील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेला शिक्षकाची बदली न करण्याच्या मागणीकरिता १६ मार्चला सकाळी १०.३० वाजता गावकऱ्यांनी कुलूप ठोको आंदोलन केले. शिक्षण विभागाला याबाबतीत माहिती देऊनही एकही अधिकारी तिकडे फिरकले नव्हते.गावकऱ्यांनी शाळेतील शिक्षक हेमने यांची बदली करु नये, तसेच नेहमी गैरहजर राहणाऱ्या शिक्षकाला हटविण्यात यावे व वर्गसंख्येनुसार शिक्षक नियुक्त करावे, अशी मागणी केली. त्यावर पचारे यांनी मी निर्णय देवू शकत नाही, अहवाल पाठविला जाईल, अशी भूमिका घेतल्याने गावकऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी यांना बोलवा व लेखी आश्वासन द्या, अशी मागणी केली. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा ठाम निर्णय घेतला व मागणी पूर्ण न झाल्यास सर्व पालक टी.सी. काढून घेतील, असा निर्णय घेतला.
यावर जि.प. सदस्य जियालाल पंधरे यांनी गटशिक्षणाधिकारी सर्याम यांना भ्रमणध्वनीवर ही बाब सांगितली. त्यावर सर्याम यांनी त्यांच्या टी.सी. देवून टाका, असे उलट उत्तर देवून मुख्याध्यापक बिरणवार यांना लगेच भ्रमणध्वनीवरुन विद्यार्थ्यांच्या टीसी देवून द्या, असा तोंडी आदेश दिल्याने पालक वर्ग अधिकच चिडला व आंदोलन सुरुच ठेवण्याची भूमिका घेतली.

Exit mobile version