गोंदिया,दि.16 : एकीकडे महाविद्यालयीन निवडणुकांना ब्रेक लागला आहे तर दुसरीकडे शासन शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये मात्र नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी चक्क ‘युथ क्लब’स्थापन करणार आहे. विशेष म्हणजे हे क्लबही निवडणुकीद्वारे स्थापन होणार असून त्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील १०६४ शाळांसाठी ७४ लाख ४५ हजाराचा निधी जिल्हास्तरावर वर्ग करण्यात आला आहे.समग्र शिक्षा अंतर्गत यावर्षी पहिल्यांदाच ‘युथ व इको क्लब’ स्थापन करण्याच्या सूचना केंद्र शासनाकडून आल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषदेने जिल्हा परिषदांना या संदर्भात कळविले आहे.
यात जिल्ह्यातील १०६४ शाळा या उपक्रमात सहभागी केल्या जाणार आहे. समग्र शिक्षाच्या बजेटनुसार उच्च प्राथमिक शाळेला प्रत्येकी दहा हजार रुपये तर प्राथमिक शाळांना प्रत्येकी पाच हजार रुपये अशा निधीची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात अनुदानित संस्थांच्या शाळांना वगळण्यात आले आहे.
प्रत्येक शाळेमध्ये विविध विषयांचे क्लब स्थापन केले जाणार आहे. त्यानंतर एका केंद्रातील दहा शाळांचा एक क्लब स्थापन होणार आहे. या क्लबचा प्रमुख निवडणुकीच्या माध्यमातून निवडला जाणार आहे. त्यामुळे शालेय जिवनात आतापर्यंत केवळ ‘लुटपुटी’चे मंत्रिमंडळ स्थापन होत होते. हे मंत्रिमंडळही केवळ एका दिवसाच्या उपक्रमापुरते मर्यादित होते. मात्र आता युवा क्लबच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना खरीखुरी निवडणूक लढण्याचा अनुभव मिळणार आहे.