गडचिरोली,दि.21ः- पंचायत समिती कोरची अंतर्गत येणार्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेखारी येथील प्राथमिक शिक्षक टिकाराम दौलत पुडो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानकट्टा येथील प्राथमिक शिक्षक नारायण मुरारी पडोटी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी येथील प्राथमिक शिक्षक रामु दुलाराम हलामी यांना आपल्या कर्तव्यावर कसूर करून शाळेच्या वेळेत दारू पिऊन येत असल्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी निलंबनाची कार्यवाही केली आहे.
या तीनही शिक्षकांनी बेजबाबदारपणामुळे महाराष्ट्र जि.प. जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम ३ चा भंग केलेला असून यानुसार या तीनही शिक्षकांना महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील नियम २ (३) (अ) नुसार सेवेतून निलंबित करण्यात आले.
टिकाराम पुडो यांना मुख्यालय पंचायत समिती आरमोरी, नारायण पडोटी यांना मुख्यालय पंचायत समिती गडचिरोली तसेच रामू हलामी यांना मुख्यालय पंचायत समिती वडसा देण्यात आले आहे. महिन्याभरात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची ही तिसरी मोठी कार्यवाही असून मद्यप्राशन करणारे सहा शिक्षक निलंबित करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी पंचायत समिती येथील संवर्ग विकास अधिकारी देवरे यांनी मद्य प्राशन करुन येणार्या शिक्षकांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी वरिष्ठांकडे केली होती