गोंडवाना विद्यापीठ भूसंपादनाचा प्रश्न तातडीने सोडवा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

0
205

गडचिरोली दि.१3 (जिमाका) :: गोंडवाना विद्यापीठाकरिता आवश्यक जमिनीबाबतचा प्रश्न तातडीने सोडवा, असे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत गोंडवाना विद्यापीठाला दिले.

पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी तसेच गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नामदेव कल्याणकर यांना भूसंपादनाबाबत असलेल्या अडचणी मार्गी लावण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, असे सांगितले. जमिनीचा मोबदला हा रेडीरेकनर व शासनाच्या अधिसूचनेनुसार देण्यात यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जमीन मालकांना बोलावून, त्यांच्या मागण्या समजून व त्यांना शासनाचे मोबदला देण्याच्या प्रचलित नियमानुसार मोबदला देणार असल्याचे सांगण्यात यावे. प्रशासन हे जमीन मालकांना नियमानुसारच भूसंपादनाचा मोबदला देणार आहे. जे जमीन मालक प्रक्रिया सांगूनही भूसंपादनाला नकार देतील त्यांच्या जमिनी विहीत कायद्यानुसार शासन अधिग्रहीत करेल, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी प्रशासनाला निर्देश दिले.

या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव इश्वर मोहूर्ले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता श्री.साखरवाडे व नगररचना कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.