Home Featured News सदानंद फुलझेले हे बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी

सदानंद फुलझेले हे बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी

0

नागपूर दि.१९ – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणारे सदानंद फुलझेले हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सच्चे अनुयायी आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांना मारवाडी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार रविवारी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पाच लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या खुल्या रंगमंचावर आयोजित या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे होते. तर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख अतिथी होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, मारवाडी फाऊंडेशनचे अध्यक्ष खासदार अजय संचेती, माजी खासदार दत्ता मेघे, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, मारवाडी फाऊंडेशनचे संस्थापक गिरीश गांधी व्यासपीठावर होते.

पुरस्काराची रक्कम दीक्षाभूमीला दान
सदानंद फुलझेले यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना या पुरस्कारामुळे माझ्यावरील जबाबदारी आणखी वाढली असल्याचे सांगितले. १९५२ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढलो आणि एका मताने जिंकलो. त्यामुळे १९५६ मध्ये मला उपमहापौर बनता आले. उपमहापौर असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली. ती यशस्वीपणे पार पाडू शकलो. तेव्हापासून दीक्षाभूमीची प्रामाणिकपणे सेवा करीत आहे. या सेवेसाठीच मला हा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे या पुरस्कारापोटी मिळालेली पाच लाख रुपयांची रक्कम मी दीक्षाभूमीला दान करीत असल्याचे फुलझेले यांनी जाहीर केले.

Exit mobile version