
नागपूर : ‘झुंड’ चित्रपटाचे कथानक नागपूरच्या माणसावर, चित्रीकरणही नागपुरात करण्यात आले. त्यामुळे येथील संस्कृती, भाषा ‘झुंड’ या चित्रपटात अपेक्षित होती. त्यामुळे नागपूरची मुले घेतली नसती तर हा चित्रपट पूर्ण करता आला नसता, असे मत या चित्रपटाचे दिग्दर्शक नागनाथ मंजुळे यांनी व्यक्त केले.
झुंडच्या प्रीमियर शोसाठी रविवारी नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. हा चित्रपट एका वेगळय़ा विषयावर असून तो नागपूरच्या एका सामान्य माणसावर चित्रित करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण नागपुरात करण्यात आले. सामान्य लोकांना घेऊन चित्रपटाची निर्मिती करता येते. असा प्रयोग सैराट चित्रपटात केला होता. नागपुरात चित्रपटाचा प्रीमियर होतो आहे याचा आनंद आहे.
चित्रपटाची कथा नागपुरातून सुरू झाली आणि नागपुरात संपली आहे. फारच छान शहर आहे. चित्रीकरणाच्यावेळी इतके प्रेम येथील लोकांनी केले. त्यामुळे मला हे शक्य झाले. बारसे फारच जीव लावणारे व्यक्तिमत्त्व असून त्यांनी अनेक सामान्य मुलांना खेळाडू म्हणून घडवले आहे. अखिलेश पॉल, बॉबी हे दोघेही नागपूरचे असून या चित्रपटात त्यांच्या भूमिका आहे. नागपूरच्या मुलांशिवाय हा चित्रपट तयार झाला नसता, असेही मंजुळे म्हणाले.
हा चित्रपट नागपूरचे स्लम सॉकरचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित असून महानायक अमिताभ बच्चन यांनी चित्रपटात फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे.
चित्रपटातून बारसे यांच्या कार्याची ओळख जगात होईल – गडकरी
समाजसेवक व क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे यांच्या कार्यावर आधारित स्मृती चित्रपटगृहात प्रदर्शित ‘झुंड’ या चित्रपटाच्या प्रीमियर शोला रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती होती. त्यांनी यावेळी चित्रपटातील कलावंत व दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची प्रशंसा केली. बारसे यांच्या कार्याची ओळख या चित्रपटातून जगात होईल. झोपडपट्टीतील मुलांना घेऊन हा चित्रपट तयार केला आहे. तो लोकांना आवडेल. नागराज यांच्या गुणवत्तेला मी प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. ते मोठे दिग्दर्शक आहेत असेही गडकरी म्हणाले. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सुलेखा कुंभारे, गिरीश गांधी आदी उपस्थित होते.