Home Featured News सत्यार्थींचे नोबेल पुरस्कार पदक राष्ट्रपती संग्रहालयात

सत्यार्थींचे नोबेल पुरस्कार पदक राष्ट्रपती संग्रहालयात

0

नवी दिल्ली – बाल हक्क कार्यकर्ते कैलास सत्यार्थी यांचा नोबेल पुरस्कार राष्ट्रपती भवनात ठेवला जाणार आहे. यामुळे येथे भेट देणाऱ्या नागरिकांना पुरस्काराचे पदक पाहता येणार आहे. सत्यार्थी यांनी आपला पुरस्कार राष्ट्राला समर्पित केला आहे. राष्ट्रपती भवनातील खास समारंभात त्यांनी बुधवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पदक सुपूर्द केले.

सत्यार्थी खूप चांगले काम करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कामाची दखल घेऊन शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशातील जनतेच्या वतीने मी त्यांचे अभिनंदन करतो, असे मुखर्जी या वेळी म्हणाले. १८ कॅरेट सोन्याचे हे पदक १९६ ग्रॅम वजनाचे आहे. राष्ट्रपती भवनातील संग्रहालयात ते ठेवण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रपती भवनचे सचिव वेनू राजमोनी यांनी सांगितले. सत्यार्थी आणि पाकसि्तानची स्त्री शिक्षणाची अल्पवयीन पुरस्कर्ती मलाला युसूफझाई यांना १० डिसेंबर रोजी शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मून सत्यार्थींची भेट घेणार
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांच्या पुढील आठवड्यातील भारत दौऱ्यात कैलास सत्यार्थी यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांच्या प्रवक्त्याने बुधवारी दिली. मून १० ते १३ जानेवारीदरम्यान दिल्ली आणि गुजरातला भेट देणार आहेत. गुजरातमध्ये ते व्हायब्रंट गुजरात परिषदेला संबोधित करतील. मून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतील.

Exit mobile version