Home Featured News आज बलिप्रतिपदा !, जाणून घ्या महत्त्व

आज बलिप्रतिपदा !, जाणून घ्या महत्त्व

0

आज शुक्रवार, दिनांक २० आक्टोबर, कार्तिक शुक्ल प्रतिपदा , बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा ,अभ्यंगस्नान, विक्रम संवत् २०७४ सौम्यनाम संवत्सर,महावीर जैन संवत् २५४४ , गोवर्धन पूजा, अन्नकूट,वहीपूजन आहे. आज व्यापारी लोक काल लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुजलेल्या वह्यांवर लेखनास प्रारंभ करतात. आज पत्नी पतीला ओवाळते आणि पती पत्नीला मौल्यवान वस्तूची भेट देतो. आजचा बलिप्रतिपदेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तातील एक दिवस मानला जातो. आज मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते. तसेच आज बलिप्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर शुभ कार्याचा प्रारंभ करतात. आप्तेष्ट – मित्र मंडळीना नूतन वर्षाच्या शुभेच्छा देतात.नूतन विक्रम संवत   २०७४ साठी लोकमतच्या वाचकांना मी प्रथम शुभेच्छा देत आहे.

बळीची पूजा
आज बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीची पूजा करावयाची असते. त्यासाठी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बळी आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा केली जाते. पुढीलप्रमाणे बळीची प्रार्थना केली जाते.
बलिराज नमस्तुभ्यं विरोचनसुत प्रभु ।
भविष्येन्द्रा सुराराते पूजेनंतर प्रतिगृह्यताम् ।।

“हे विरोचनपुत्र आणि सामर्थ्यवान बलिराजा, तुला माझा नमस्कार असो. तू भविष्यकालीन इंद्र व असुरशत्रू आहेस. ( तरी) ही ( मी केलेली)  पूजा  तू ग्रहण कर.”अशी प्रार्थना करून बळीप्रीत्यर्थ दीप आणि वस्त्रे यांचे दान करतात.
पूर्वी गोकुळवासीयांचा असा समज होता की इंद्र पाऊस पाडतो. म्हणून ते इंद्राची पूजा करीत असत. भगवान कृष्णाने सांगितले की “इंद्र पाऊस पाडीत नसून गोवर्धन पर्वतामुळे पाऊस पडतो म्हणून पावसासाठी गोवर्धन पर्वताची पूजा करायला हवी.”  पर्वत आणि वृक्ष यामुळे पाऊस पडतो ही गोष्ट मुले आज प्राथमिक शाळेत शिकतात तीच गोष्ट त्याकाळी  भगवान कृष्णाने गोकुळवासीयांना सांगितली. म्हणून दरवर्षी कार्तिक शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी गोवर्धन पूजा करण्याची पद्धत पडली आहे. तसेच या दिवशी अन्नकूट करण्याची प्रथा आहे. गावातील प्रत्येक जण एकेक खाद्यपदार्थ मंदिरात आणतो.आणलेले सर्व अन्नपदार्थ एकत्र ठेवून तो नैवेद्य ईश्वराला अर्पण केला जातो. नंतर सर्व गावकरी एकत्र बसून त्या प्रसादाचे सहभोजन करतात. प्राचीन काळापासून सर्वानी एकत्र येऊन प्रसाद भक्षण करण्याची प्रथा चालू राहिली आहे.  कार्तिक शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी कालभैरवाची पूजा करण्याची प्रथा आहे. या दिवशी सकाळी लहान मुले मीठ घेऊन गावात विक्री करण्यासाठी फिरतात. नूतन वर्षारंभी शुभशकून म्हणून लोक त्यांच्याकडून मीठ खरेदी करतात.  ही प्रथा विशेषत: गुजरातमध्ये जास्त करून आढळते.

Exit mobile version