Home Featured News बंदीस्त असलेला महात्मा गांधींचा पुतळा अखेर हटविला

बंदीस्त असलेला महात्मा गांधींचा पुतळा अखेर हटविला

0

वर्धा : सालोड (हि.) येथील ग्रामपंचायत परिसरात असलेला महात्मा गांधी यांचा पुतळा भग्नावस्थेत असल्याने प्लास्टिकने बांधण्यात आला होता. गत ३0 वर्षांपासून बांधून असलेला हा पुतळा अखेर गावकर्‍यांच्या मागणीवरून शुक्रवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने हलविण्यात आला.
याबाबत थोडक्यात वत्त असे की, येथील ग्रामपंचायतीच्या परिसरात तत्कालीन मुख्यमंत्री वसंत नाईक यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी १९७0 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. सन १९९५-९६ मध्ये एका अज्ञात समाज कंटकाने मध्यरात्री दगड मारून महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केली होती. यावरून शिवसैनिकांनी आंदोलन केले होते. यावेळी प्रशासन विरूद्ध गावकरी, शिवसैनिक यांच्यात दंगल घडून आली होती. तेव्हापासून हा पुतळा झाकून ठेवला होता. अशातच ६ डिसेंबर २0१४ रोजीच्या ग्रामसभेत हा पुतळा हलविण्याबाबत ठराव घेण्यात आला. ठरावाची प्रत सरपंच गीता झाडे, ग्रा. पं. सदस्य आशिष कुचेवार, ग्रामविकास अधिकारी व्ही. जी. जोगे यांच्यासह गावकर्‍यांना तसेच जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आली.
सदर प्रांगणामध्ये राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा होत असल्याने नवप्रवाह संस्था द्वारा संचालीत न्यु स्टार स्पोर्टींग क्लबच्या पदाधिकारी व खेळाडूंनी जिल्हाधिकार्‍याची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान निर्णय घेत अखेर आज जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून नायब तहसीलदार प्रिती डुडुलकर, सरपंच गीता झाडे, उपसरपंच राम मेहत्रे, तलाठी शैलेष देशमुख, ग्राम विस्तार अधिकारी जोगे, पोलीस पाटील महेश टेकाम यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी यांना श्रद्धाजंली अर्पण करून त्यांचा पुतळा काढून प्रशासनाच्या सुपूर्द करण्यात आला.

Exit mobile version