Home Featured News अभिनेत्री श्रीदेवी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

अभिनेत्री श्रीदेवी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

0

मुंबई,दि.25(वृत्तसंस्था) : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी चे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या. श्रीदेवी आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती बोनी कपूर आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला आहे. त्यांनी अभिनयाची सुरुवात लहान असतानाच सुरु केली होती. 1978 साली सोलावा सावन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम केले आहे. बॉलिवूडमधील सदमा, नागिन, निगाहें, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गवाह, जुदाई अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. याचबरोबर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले.

निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर जुदाई चित्रपटाचा अपवाद वगळता श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी मिसेस मालिनी अय्यर या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. त्यानंतर 2012 साली आलेल्या ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये  पुनरागमन केले. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांनी भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

Exit mobile version