Home Featured News दत्तक घेण्यात महाराष्ट्राची आघाडी

दत्तक घेण्यात महाराष्ट्राची आघाडी

0

मुंबई दि. ११ –देशात दत्तक घेण्याच्या प्रमाणात चांगलीच वाढ झाली असून यात महाराष्ट्र राज्य अव्वल नंबरवर आहे. त्यातही मुली दत्तक घेण्यासाठीचे कायदे अधिक कडक असूनही मुली दत्तक घेण्याचे प्रमाण अधिक आहे. सेंट्रल अॅडॉप्शन रिसोर्स अॅथॉरिटीच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. या अहवालानुसार २०१४ सालात २३०० मुली दत्तक घेतल्या गेल्या तर याच काळात १६०० मुले दत्तक घेतली गेली. म्हणजे मुली दत्तक घेण्याचे प्रमाण ३६ टक्के अधिक आहे.

अॅडॉप्शन रिसोर्सचे संचालक विरेंद्र मिश्रा म्हणाले की दत्तक घेण्यात देशात महाराष्ट्र आघाडीवर आहे. गेल्या वर्षात महाराष्ट्रात ९४७ मुले दत्तक घेतली गेली. ७ मे रोजी ज्युवेनाईल जस्टीस कायद्यात सुधारणा करण्यात आली असून तो लोकसभेत पास झाला आहे. या कायद्यामुळे दत्तक प्रक्रिया अधिक सोपी होईल. ही प्रक्रीया सेंट्रलाईज करण्यात येत आहे. त्यानंतरच बालकांची माहिती पालकांना दिली जाणार आहे.

पहिला कायदेशीर दत्तक देशात १९७९ साली दिला गेल्याचे सांगून मिश्रा म्हणाले की त्यापूर्वी नातेवाईक अथवा ओळखीतले मूल दत्तक घेण्याचे प्रमाण खूपच मोठे होते.

Exit mobile version