24 तासात मिळणार रिपोर्ट तर सीटीस्कॅनसह प्लाझ्माथेरपीचे दर निश्चित-डाॅ.राजेश टोपे

0
455

गोंदिया,दि.24,-: कोरोनाबाधित रुग्णांचा तपासणी अहवाल यायला तीन ते चार दिवस लागत असून यानंतर ते रिपोर्ट 24 तासाच्या आत देणे बंधनकारक राहणार आहे.सोबतच रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पद्धतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (200 मि.ली.) खाजगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार रुपये इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली आहे. यापेक्षा अधिक दर आकारल्यास त्यांनी आकारलेल्या अतिरिक्त रक्कमेची परतफेड संबधित रुग्णांना करणे अनिवार्य राहील अन्यथा संबंधित रक्तपेढीचा परवाना रद्द करण्याबाबतची कारवाई संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत करण्यात येईल,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.सोबतच राज्यात सीटीस्कॅन एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित करण्यात आले असून १६ पर्यंत स्लाईसच्या मशीनवर चाचणीकरिता २ हजार रुपये, १६ ते ६४ स्लाईसच्या मशीनवरील चाचणीकरिता २ हजार ५०० रुपये आणि ६४ ते २५६ स्लाईसच्या मशीनवरील चाचणीसाठी ३ हजार रुपये असल्याची  माहिती गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना दिली.त्यापुर्वी त्यांनी गोंदियातील मेडीकल काॅलेज,बीजीडब्लू रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर आढावा बैठक घेतली.जिल्हयातील रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांना परवानगी देण्यात आल्याचे सांगत सध्याचे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता हे स्थायी असल्याचे सांगितले.

यावेळी पालकमंत्री अनिल देशमुख आणि राज्यसभा सदस्य खा.प्रफुल पटेल,आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे,आमदार सहसराम कोरेटे, माजी.खा.डॉ.खुशाल बोपचे,माजी आ.राजेंद्र जैन,आमदार राजू कारेमोरे,आमदार प्रकाश गजभिये,जिल्हाधिकारी दिपक कुमार मीना,आरोग्य संचालक डॉ.अर्चना पाटील, आरोग्य उपसंचालक डॉ.संजीव जयस्वाल,अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खेवले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नरेश तिरपुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भूषणकुमार रामटेके,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे हे उपस्थित होते.

राज्यात सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधितांवर ट्रायल बेसिसवर निशुल्क प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धती वापरण्यात येत आहे.केंद्र शासन व सेंट्रल ड्रग स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशने ऑफ लेबल प्लाझ्मा थेरपी वापरण्याच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्यानंतर प्लाझ्माफेरॅसिस पध्दतीने संकलित करण्यात आलेल्या कॉन्व्हॅलेसंट प्लाझ्मा (ऑफ लेबल) वापरण्यासाठी खाजगी व विश्वस्त रक्तपेढ्यांकडून प्लाझ्मा थेरेपीसाठी आवश्यक प्लाझ्मा बॅगसाठी अवाजवी शुल्क आकारले जात असल्याचे निदर्शनास आले.

त्यानुसार प्लाझ्मा बॅग (२०० मिली) ५५०० रुपये आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे.नॅट चाचणीसह प्लाझ्मा बॅग उपलब्ध करुन दिल्यास या चाचणीसाठी कमाल दर १२०० रुपये प्रति चाचणी (प्लाझ्मा बॅगेच्या किंमतीव्यतिरक्त) तर केमिल्युमिनेसन्स तपासणी करुन प्लाझ्मा बॅग दिल्यास त्यासाठी प्रति चाचणी कमाल दर ५०० रुपये (प्लाझ्मा बॅग किंमतीव्यतिरक्त)  आकारण्यास मान्यता दिली आहे.