
मुंबई, दि. 25: माहुल (मुंबई ) येथील प्रदूषण नियंत्रणासाठी राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या सूचनांचे पालन करत तेथील उद्योग आणि पर्यावरण यांचा समतोल साधून परिसरातील प्रदूषण नियंत्रण करावे, अशा सूचना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी संबंधीतांना दिल्या.
माहुल, मुंबई येथील प्रदूषण समस्येबाबत काल आयोजित बैठकीत मंत्री श्री. ठाकरे बोलत होते. यावेळी पर्यावरण राज्यमंत्री श्री. संजय बनसोडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव श्री. शिनगारे, माहुल परिसरातील विविध उद्योगांचे प्रतिनिधी, मुंबई महापालिका अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, माहुल येथील वाढत्या प्रदूषणाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी तेथील उद्योगांनी राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. माहुल भागातील उद्योगांनी पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक निकषांची पूर्तता पुढील काही दिवसात करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रीय हरित लवाद यांनी सूचना दिलेल्या आहेत. सांडपाणी व्यवस्थापन, ग्रीन झोनची निर्मिती, हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजना आदींची अंमलबजावणी करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, प्रदूषण नियंत्रणासाठीच्या विविध आवश्यक उपाययोजना राबवून माहुल येथील प्रदूषण नियंत्रित करुया. उद्योग आवश्यक आहेतच, पण त्याबरोबर पर्यावरणाचे रक्षणही आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
यावेळी माहुल येथील प्रदूषण नियंत्रणासाठी व राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना याबाबतीत माहिती देण्यात आली.