सांगली, दि. 23 : लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांचे स्वप्न असलेली वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना येत्या दोन वर्षात पूर्ण करू. तसेच चांदोली पर्यटन विकास करण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी येथे केले.
शिराळा तालुक्यातील चिखली येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना लिमिटेड यशवंतनगर येथे स्वर्गीय फत्तेसिंगराव नाईक यांच्या पुर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, माजी केंद्रीय कृषि मंत्री तथा खासदार शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार मोहनराव कदम, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमनताई पाटील, आमदार अरुण लाड, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार सत्यजीत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजीत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले, स्वर्गीय फत्तेसिंगराव नाईक हे मितभाषी संयमी व कायम स्मरणात राहणारे व्यक्तिमत्व होते. शिराळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. विश्वास उद्योग समूह उभारून शिराळा तालुक्याचा विकास केला. शिराळा तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक योजना पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांचे स्वप्न असलेली वाकुर्डे बुद्रुक योजना येत्या दोन वर्षात पूर्ण करू. तसेच शिराळा तालुक्याच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू. त्याचबरोबर शिराळा नगरपंचायतीचा विकास करू असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, कोरोना काळात काही विकास कामे थांबलेली आहेत, ही विकास कामे आता टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जातील. कोरोनाच्या कालावधीमध्ये शिराळा तालुक्यात त्याचा प्रभाव जास्त होता, तरीही येथील जनतेने संयमाने आणि धैर्याने तोंड देऊन कोरोनावर मात केली. कोरोना काळात शिराळा नगरपंचायतीने चांगले काम केले असून शिराळा नगरपंचायतीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करू.
वाकुर्डे बुद्रुक योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये 100 कोटींची तरतूद करण्यात आली असून ही योजना पूर्ण करण्यासाठी पुढील काळात आणखी निधी लागल्यास तोही उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर पूर्णपणे प्रयत्न करू, असे आश्वासन देऊन पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, फत्तेसिंगराव नाईक यांचे चिरंजीव आमदार मानसिंगराव नाईक यांचेही शिराळा तालुक्याच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. शिराळा तालुक्याचा विकास करण्यासाठी आमदार मानसिंगराव नाईक यांना आपण पूर्णपणे मदत करून शिराळा तालुक्याचा विकास करू. जलसंपदा विभागाची चांदोली धरणाजवळ जी जमीन आहे ही पर्यटनाच्या विकासासाठी वापरात आणता येईल का याबाबतही पुढील काळात विचारविनिमय करण्यात येतील, असेही ते यावेळी म्हणाले.
खासदार शरद पवार यावेळी म्हणाले, अनेक वर्ष अनेक पिढ्या सेवेचे व्रत घेऊन ज्यांनी आपले आयुष्य वेचले अशा व्यक्तीमध्ये लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. डोंगराळ आणि जिल्ह्याच्या एका बाजूला असलेल्या तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासामध्ये शिराळा-बिळाशीचा इतिहास प्रसिद्ध आणि परिचित आहे. या इतिहासाची साक्ष देणारे नाईक हे अत्यंत आघाडीचे नेते होते. फत्तेसिंगराव नाईक यांनी कधीही लाचारी पत्करली नाही, आपल्या तत्वांशी कधी तडजोड केली नाही. खस्ता खाऊन शिराळा तालुका घडवण्यासाठी ते नेहमी अग्रेसर राहिले, त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. फत्तेसिंगराव नाईक शिराळा तालुक्याचे खऱ्या अर्थाने लोकनेते होते. ते कधीही प्रसिद्धीसाठीही पुढे आले नाहीत. त्यांनी स्वतःला नेहमी कामांमध्ये वाहून घेतले. सामान्य जनतेचा विकास करण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. शिराळा तालुक्यात पाणी योजना आणली. शिक्षणाची गंगा आणि उद्योगांची उभारणी करणे, पुढील पिढीला दर्जेदार शिक्षण मिळवून देणे यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले. सामान्य माणसाचे जीवन समृद्ध होण्यासाठी फत्तेसिंगराव नाईक नेहमी अग्रेसर राहिले. फत्तेसिंगराव नाईक यांचा विश्वास सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात उभारलेला पूर्णाकृती पुतळा हा पुढच्या पिढीला नेहमीच प्रेरणादायी ठरेल. समाजामध्ये चांगली प्रवृत्ती वाढीस लागावी यासाठी फत्तेसिंगराव नाईक यांचा पुतळा प्रेरणादायी असेल, असे ते म्हणाले. त्याचबरोबर राज्याला समृध्दीच्या मार्गावर नेण्यासाठी साखर कारखानदारीची महत्वाची भूमिका आहे. साखर उद्योगात वीज निर्मिती, इथेनॉल, लिकर यांची निर्मिती केली जाते. त्याचबरोबर आता कारखान्यांनी सीएनजी गॅस उत्पादन करण्यावर भर दिला पाहिजे. यामुळे कारखाना परिसरात या गॅसची उपलब्धता होऊन कारखान्यास अधिकचे उत्पन्न मिळेल, आणि या उत्पादनातून शेतकऱ्यांना अधिकचा लाभ देता येईल. त्यामुळे कारखान्यांनी अशा नवनवीन प्रयोगांना प्राधान्य द्यावे.
प्रारंभी खासदार शरद पवार यांच्या हस्ते फत्तेसिंगराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसेच लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांच्या जीवनपटावर तयार करण्यात आलेल्या चलतचित्रफितीचे अनावरणही करण्यात आले.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, स्वर्गीय फत्तेसिंगराव नाईक यांनी आपले संपूर्ण जीवन समाजाप्रती दिले. त्यांच्या याच प्रेरणेतून विश्वास उद्योग समुहाची पुढील वाटचाल सुरू आहे. त्यांचा हाच आदर्श ठेवून समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्नशील राहू. आभार विश्वास सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब पाटील यांनी मानले.