उपवनसरंक्षक निलबिंत,अप्पर प्रधान मुख्य संरक्षक श्रीनिवास रेड्डींना हटवले

0
284

दीपालीच्या पार्थिवावर मोरगाव येथे होणार अंत्यसंस्कार

अमरावती,दि.26ः- जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. प्रारंभी दीपालीच्या कुटुंबातील सदस्य व बेलदार समाज संघटना यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नकार दिला. शवविच्छेदन गृहासमोर दिवसभर धरणे आंदोलन केले. त्यांनतर पोलिसांनी सहआरोपी म्हणून अप्पर प्रधान मुख्य संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे पोष्टमार्टेम सुरू झाले. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. दिपालीच्या पार्थिवावर मोरगाव ता. नांदगाव जि. अमरावती येथे अंत्यसंस्कार होणार असून, पार्थिव गावी रवाना करण्यात आले आहे.तर प्रशासनानेही वेगाने हालचाली करीत उपवनसरंक्षक शिवकुमारला निलबिंत केले आहे.तर श्रीनिवास रेड्डी यांनी याप्रकरणात हयगय केल्याने त्यांनाही त्या पदावरून पदमुक्त करुन नागपूर वनभवनात हलविण्यात आल्याचे पत्र मुख्य वनसरंक्षक (मंत्रालय) अरविंद आपटे यांनी प्रधानमुख्य वनसरंक्षकांना पाठविले आहे.

दरम्यान, आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक शिवकुमार यांना अमरावती पोलीसांनी आज नागपुरातून अटक केली. दक्षिणेतील कर्नाटक या त्यांच्या मूळगावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या शिवकुमार यांना नागपूर रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी ताब्यात घेतले. दिवंगत श्रीमती दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येसंदर्भात विनोद शिवकुमार , उपवनसंरक्षक , गुगामल वन्यजीव विभाग , चिखलदरा यांचेविरुध्द धारणी पोलीस ठाणे येथे भारतीय दंड विधान संहितेमधील कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल झाला असून त्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे . त्यांच्या निलंबनाचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत . यास्थितीत उपवनसंरक्षक , गुगामल वन्यजीव विभाग , चिखलदरा या पदाचा अतिरिक्त कार्यभार  अविनाश कुमार , भावसे , उपवनसंरक्षक ( वन्यजीव ) , सिपना विभाग यांचेकडे पुढील आदेश होईपर्यंत सोपविण्यात आले आहे . त्याचप्रमाणे  दिवंगत श्रीमती दीपाली चव्हाण यांनी विनोद शिवकुमार यांच्या वर्तणुकीबाबत वेळोवेळी अवगत करुनही एम.एस. रेड्डी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक , मेळघाट व्याघ्र प्रकल्प , अमरावती यांनी त्यांच्या तक्रारीची न घेतलेली दखल गंभीर असल्यामुळे त्यांनाही सदर पदावरुन अन्यत्र पदस्थापना देण्याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे.तोपर्यत श्री. रेड्डी यांची अन्यत्र पदस्थापना होईपर्यंत त्यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वनबल प्रमुख ) , नागपूर यांचे कार्यालयात हजर राहून पुढील आदेशाची प्रतिक्षा करावी व सद्यस्थितीत त्यांच्या पदाचा कार्यभार प्रविण चव्हाण,भावसे,मुख्य वनसंरक्षक(प्रा.) अमरावती यांचेकडे सोपविण्यात आल्याचेचे पत्र सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्यांचे मान्यतेने निर्गमित करण्यात आले आहे .