
पुणे,दि.10ः- पुण्यातील रामकृष्ण हरि कृषी प्रतिष्ठानच्या वतीने नाट्यकला क्षेत्रातील ५१ पडद्यामागील कलाकारांना कृतज्ञता म्हणून प्रतिष्ठान मार्फत त्यांना एक महिन्याच्या शिधा वस्तूंचे वितरण आज गुरुवारी (दि १०) करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळ अध्यक्ष प्रा. सदानंद मोरे यांच्या हस्ते उपक्रमास प्रारंभ झाले.प्रतिष्ठानचे व पश्चिम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष उल्हसदादा पवार, अभिनव शिक्षण संकुलचे संस्थापक राजीव जगताप, माजी नगरसेवक व प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संजय बालगुडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड आदी मान्यवर उपस्थित होते.
दुर्लक्षित घटकांना रामकृष्ण हरि कृषी प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने केलेले काम कौतुकास्पद असल्याचे प्रा. मोरे यांनी सांगितले.पडद्यामागील कलाकारांना रामकृष्ण हरि कृषी प्रतिष्ठाननी केलेली मदत थोडी असली तरी बहुमोल असल्याचे श्री पवार म्हणाले. प्रतिष्ठानचे विश्वस्त हरी चिकणे, संजय बालगुडे, सुनील महाजन, मंदार चिकणे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.