Home महाराष्ट्र अहमदनगर जिल्हा प्रशासनाचा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतला आढावा

अहमदनगर जिल्हा प्रशासनाचा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतला आढावा

0

अहमदनगर, दि.१७-  “जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून लसीकरणाचा वेग वाढवावा. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे सदोष करण्यात यावेत अशा सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

महसूलमंत्री श्री.थोरात यांनी अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री.राजेंद्र क्षीरसागर, मनपा आयुक्त श्री.शंकर गोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.जे.डी.कुलकर्णी आदी उपस्थित होते.

श्री.थोरात म्हणाले, जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशावेळी गणपती विसर्जनाला कोठेही गर्दी होणार नाही. यासाठी प्रशासनाने नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.  प्रत्येक तालुक्यात नियमितपणे कोविड चाचणी होत आहेत. अशावेळी आरोग्य प्रशासनाने दिवसाला जास्तीत  जास्त कोरोना चाचणी करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. कोरोनासोबत चिकनगुनिया, डेंग्यू यासारखे साथीचे आजार वाढत आहेत. यावर आरोग्य प्रशासनाने सतर्क राहून शहरांमध्ये आरोग्य फवारणी करावी, अशा सूचनाही श्री.थोरात यांनी आरोग्य प्रशासनाला दिल्या.

महसूल प्रशासनाचा आढावा घेताना श्री.थोरात म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाजरी, सोयाबीन, कांदा या पिकांचे तसेच फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. हजारांच्या संख्येने पशुधन पुरात वाहून गेले आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीचा परिणाम झालेला आहे. तेव्हा स्थानिक स्तरावरील महसूल प्रशासनांच्या लोकांनी शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे त्वरित करावेत. ई-पीक पाहणीच्या कामाला गती देणे आवश्यक आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी बंद असलेला वाळू लिलाव तात्काळ सुरू करणे आवश्यक आहे. सर्वांनी महसूल सप्तपदीचे पालन करावे, अशा शब्दात त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.

Exit mobile version