Home महाराष्ट्र स्मार्ट सिटी योजना फसवी – राज ठाकरें

स्मार्ट सिटी योजना फसवी – राज ठाकरें

0

मुंबई,दि.9-केंद्र सरकारकडून मोठा गाजावाजा केला जात असलेली स्मार्ट सिटी योजना फसवी असून, केवळ राजकीय फायदा मिळविण्यासाठी ही योजना आणण्यात आली असल्याची घणाघाती टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी केली. स्मार्ट सिटी योजनेला मनसेचा विरोध असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, स्मार्ट सिटी योजनेमध्ये पाच वर्षांत केंद्राकडून ५०० कोटी मिळणार आहेत. मुंबई, ठाणे, पुणे या राज्यातील शहरांचे अर्थसंकल्प हजारो कोटींचे आहेत. त्यामुळे केंद्राकडून प्रत्येक वर्षाला मिळणारे १०० कोटी रुपये काहीही कामाचे नाहीत. त्यातून कोणतेही विकास प्रकल्प होऊ शकणार नाही. भाजप केवळ पाच वर्षांनी या योजनेचा राजकीय फायदा उठविण्याचा सोशल मीडियातून प्रयत्न करतो आहे. मुळात महापालिका स्वायत्त असताना केंद्र सरकार त्यामध्ये लुडबूड का करते आहे, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी केंद्राकडून आम्हाला एक रुपया नको आणि आम्हीही केंद्राला एक रुपया देणार नाही. आम्ही आमच्या जीवावर गुजरात चालवू, असे त्यांनी म्हटले होते. मग तेच मोदी आता केवळ राजकीय फायदा मिळवण्यासाठी अशा योजना आणत आहेत, असा आरोप करून राज ठाकरे म्हणाले, स्मार्ट सिटी, अमृत अशा एकामागून एक योजना लोकांच्या तोंडावर मारल्या जात आहेत. आधीच्या यूपीए सरकारने आणलेल्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेतूनही महापालिकांना निधी मिळाला होता. मात्र, त्या सरकारने या योजनेचा कधी इतका गाजावाजा केला नाही.

Exit mobile version