Home महाराष्ट्र लोकसहभागातून ‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व’ यशस्वी करण्याचे पालकमंत्री सतेज...

लोकसहभागातून ‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व’ यशस्वी करण्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांचे आवाहन

0

कोल्हापूर, दि. 18 : राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी निमित्ताने आयोजित करण्यात आलेला “लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व” उपक्रम लोकसहभागातून यशस्वी करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या उपक्रमाच्या आयोजनाबाबत बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.

राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी निमित्ताने, शासन आणि लोकांच्या वतीने “लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व” १८ एप्रिल ते २२ मे २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.. या निमित्ताने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कृतज्ञता पर्वच्या निमित्ताने पालकमंत्री सतेज पाटील यांनी, शाहू मिलच्या ठिकाणी आज रविवारी भेट देऊन पाहणी केली. याठिकाणी सुरु असलेली साफसफाई आणि इतर कामांचीही त्यांनी पाहणी करुन आवश्यक त्या सूचना केल्या. या पाहणीनंतर त्यांनी, जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी लोकराजा शाहू कृतज्ञता पर्वच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांची माहिती घेतली. 18 एप्रिल ते 22 मे या कालावधीत राबविण्यात येणारे उपक्रम नियोजनबद्धरित्या चांगल्या पद्धतीने राबवा. या सर्व उपक्रमामध्ये, सर्व लोकप्रतिनिधी, जिल्ह्यातील सर्व संस्था, संघटना आणि नागरिकांनी उ्स्फूर्तपणे सहभागी होण्याबरोबरच लोकसहभागातून लोकराजा कृतज्ञता पर्व यशस्वी करा, अशा सूचनाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी बैठकीत केल्या.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचे कार्य आणि त्यांचे विचार सर्वदूर पोहोचवण्याबरोबरच त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १८ एप्रिल ते २२ मे २०२२ या कालावधीत लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व आयोजित करण्यात येत आहे. या पर्वांतर्गत राबविण्यात येणारे विविध उपक्रम नियोजनबद्धरीत्या राबवा.

लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व आयोजित करताना १८ एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजता जुना राजवाडा, भवानी मंडप येथून त्याची सुरुवात होणार आहे. श्रीमंत शाहू छत्रपती, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार  मालोजीराजे  छत्रपती, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ,  राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, तालीम, मंडळे, विविध सामाजिक संस्था – संघटनांचे  कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात होणार आहे.

यासंदर्भातही पालकमंत्री पाटील यांनी आढावा घेत, सूचना केल्या.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी, बैठकीत आयोजित उपक्रमांची माहिती देवून प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती दिली. 6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंदासाठी, संपूर्ण जिल्ह्यात स्तब्धता पाळण्यात येणार आहे. याची माहिती पब्लिक अड्रेस सिस्टीम तसेच गाव पातळीपर्यंत देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री.रेखावार यांनी सांगितले. यावेळी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, संयोजन समितीचे आदित्य बेडेकर, प्रमोद पाटील, उदय गायकवाड, अजय दळवी, ऋषिकेश केसरकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version