मुंबई-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ही शपथ दिली. या सोहळ्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून रंगलेल्या राज्यातल्या सत्तासंघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शपथविधी सोहळ्यात शिंदे समर्थकांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची जोरदार घोषणाबाजी केली. नवे सरकार शनिवारी विधानसभेच्या पटलावर बहुमत सिद्ध करणार आहे.सोबतच नव्या अध्यक्षांची निवड सुध्दा केली जाणार आहे.
शिंदेची पहिली प्रतिक्रिया
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, हा बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय आहे. राज्याचा विकास, महाराष्ट्राच्या सर्व घटकाला न्याय देण्याचे काम करू. सर्वांना सोबत घेऊन, विश्वासात घेऊन काम करेन. आता देवेंद्र फडणवीस सुद्धा सोबत आहेत. या साऱ्यांच्या साथीने विकासाचा गाढा हाकेन असे सांगितले.पत्रकारांचे रखडलेले सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.तसेच प्रलबिंत प्रश्नासह इतर मुद्यावर पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले.